धाराशिव (जिमाका) – धाराशिव जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती अभियानास दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी सुरुवात झाली असून हे अभियान ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे. प्रा.आ.केंद्र शिराढोण,ता.कळंब येथे कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनयशिल कुलकर्णी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत बनसोडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जे.एन.सय्यद तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची मौखिक कर्करोग,स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी करण्यासाठी प्रत्येक परिमंडळास एक कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे.या मोहिमेचा उद्देश ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये कर्करोगाबाबत जनजागृती करणे तसेच आजाराचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात करून योग्य उपचार उपलब्ध करून देणे हा आहे. तपासणीसाठी व्हॅनमध्ये मौखिक कर्करोगासाठी वेलस्कोप व डेंटल चेअर,तर गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी कोलपोस्कोपची सुविधा असून,स्त्रीरोग तज्ञ व दंत शल्यचिकित्सक यांच्या मार्फत निदान केले जाणार आहे.आशा स्वयंसेविकांना ३० वर्षांवरील नागरिकांना तपासणीसाठी संदर्भित करण्याचे निर्देश दिले आहेत. संशयित रुग्णांचे बायोप्सी नमुने महालॅबमार्फत तपासले जाणार असून,निदान झालेल्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येईल.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कर्करोग तपासणी व जनजागृती अभियानाचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान