August 10, 2025

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना शेतकऱ्यांना करतेय आर्थिकदृष्ट्या सक्षम

  • राज्यातील शेतीसाठी नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने अनेक योजना राबवल्या जात आहेत.त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना”.ही योजना राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करणारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ही योजना प्रभावीपणे राबवली जाते.या योजनेचा उद्देश फळबाग लागवडीद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे,कमी पाणी लागणाऱ्या पीक पद्धतीचा अवलंब करणे आणि टिकाऊ शेतीला चालना देणे हा आहे.
  • *योजनेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे*
  • भाऊसाहेब फुंडकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कृषी नेते आणि माजी कृषी मंत्री होते.त्यांचे नाव ग्रामीण भागात कृषी क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानाने घेतले जाते. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून महाराष्ट्र शासनाने २०१८ मध्ये “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना” सुरू केली.
  • पारंपरिक पिकांपेक्षा अधिक आर्थिक फायदा देणाऱ्या फळबाग शेतीस चालना देणे.कमी पाण्यावर टिकणारी आणि हवामानास सुसंगत फळपिके प्रोत्साहित करणे.शेतीच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणे आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना देणे.शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे आणि दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे.ही योजना लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विशेषतः फायदेशीर आहे.
  • *लाभ मिळवण्यासाठी अटी व शर्ती*
  • अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.त्याच्याकडे स्वतःच्या मालकीची किंवा किमान ७ वर्षांसाठी लीजवर घेतलेली शेती असावी.इच्छुक शेतकऱ्यांनी ठरवलेल्या निकषांनुसार योग्य फळपिकांची निवड करावी.अर्ज करण्याआधी महाडीबीटी (Mahadbt) पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी ठरावीक कालावधीत फळबाग लागवड केली असल्याचा पुरावा द्यावा लागतो.
  • *अनुदानाचे स्वरूप*
  • राज्यातील शेतकऱ्यांना ठराविक प्रमाणात आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० टक्के अनुदान दिले जाते.काही विशेष बाबतीत हे प्रमाण वाढू शकते. उदा.आदिवासी शेतकऱ्यांसाठी आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त अनुदान दिले जाते.ही योजना अनेक प्रकारच्या फळबाग लागवडीसाठी लागू आहे.राज्याच्या हवामानाला अनुरूप आणि कमी पाण्यात टिकणाऱ्या फळपिकांना प्रोत्साहन दिले जाते.यामध्ये खालील पिके प्रामुख्याने समाविष्ट आहेत.यामध्ये डाळिंब, आंबा,संत्रा,लिंबू,पेरू,सीताफळ,अंजीर, केळी,नारळ आणि सुपारी ही पिके आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असून,यांचा निर्यात क्षेत्रातही मोठा वाटा आहे.
  • *अर्ज करण्याची प्रक्रिया*
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी (https://mahadbtmahait.gov.in/) या पोर्टलवर अर्ज भरला जातो. संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
    महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी लागते.लॉगिन करून “कृषी विभाग” अंतर्गत “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना” निवडावी लागते.फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरावी लागते.(जसे की नाव,आधार क्रमांक,शेतीची माहिती इ.).बँक खाते तपशील आणि आवश्यक कागदपत्रे (७/१२ उतारा, बँक पासबुक झेरॉक्स,लागवडीचा आराखडा इ.) अपलोड करावा लागतो.मंजुरी मिळाल्यानंतर,अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
    या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे लाभ मिळाले आहेत.त्याचे काही महत्त्वाचे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे.कमी पाण्यावर आधारित शेतीला चालना मिळाली आहे.पारंपरिक शेतीपेक्षा अधिक नफा मिळाल्यामुळे ग्रामीण भागात जीवनमान सुधारले आहे.शेतीशी निगडीत प्रक्रिया उद्योग (जसे की जॅम,ज्यूस,ड्राय फ्रूट्स) वाढीस लागले आहेत.
    शेतकरी आत्मनिर्भर होण्यास मदत झाली आहे.ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. सरकारने अर्ज प्रक्रिया सुलभ करून मदत केंद्रे वाढवली आहेत.शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.योग्य पद्धतीने अनुदान वितरणासाठी काटेकोर तपासणी करण्यात येत आहे.हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठिबक सिंचन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येते.
    “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना” ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.कमी पाणी लागणारी फळबाग शेती केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते आणि कृषी क्षेत्र अधिक सक्षम आणि आधुनिक होऊ शकते.योग्य मार्गदर्शन,शासनाची सतत मदत आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब केल्यास ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरत आहे.तसेच शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळत असून आता शेतकरी पारंपरिक शेतीऐवजी फळबाग लागवडीकडे वळला आहे.

    — संकलन —
    जिल्हा माहिती कार्यालय,धाराशिव

error: Content is protected !!