धाराशिव (जिमाका) – आठवी आर्थिक गणना यशस्वीपणे राबवण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली ४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.या बैठकीत आर्थिक गणनेच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे,जिल्हा सांख्यिकी अधिकारी सुधाकर जाधव,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे,जिल्हा उपनिबंधक पांडूरंग साठे,सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला,जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे,नगर पालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त अजित डोके व धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड प्रामुख्याने उपस्थित होत्या. या बैठकीत आर्थिक गणनेच्या महत्त्वाच्या टप्प्यांचा आढावा घेण्यात आला.आर्थिक गणना हा केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली होणारा महत्त्वाचा उपक्रम आहे.देशभरातील उद्योग,व्यवसाय आणि आर्थिक घडामोडींची अचूक माहिती मिळवण्यासाठी ही गणना आवश्यक आहे.त्यामुळे याचे अचूक आणि वेळेत संकलन होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी बैठकीत दिले. बैठकीत आर्थिक गणनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळ,तांत्रिक सुविधा आणि अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आर्थिक गणनेतील डिजिटल साधनांचा प्रभावी वापर,क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण,तसेच संकलित माहितीसंदर्भात गोपनीयतेचे नियम पाळण्याचे महत्त्व यावरही भर देण्यात आला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आर्थिक गणना वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसेच,जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी यात सक्रीय सहभाग घ्यावा,नागरिकांनी सहकार्य करावे,तसेच गणनेच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखावी, असेही डॉ.ओंबासे यांनी सांगितले. आर्थिक गणना वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधावा आणि आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशा सूचना डॉ. ओंबासे यांनी दिल्या.
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन