मोहा गावच्या कै.सुमनआई मोहेकर या समाजसेवेचे एक जिवंत उदाहरण आहेत.त्यांचे कार्य सावित्रीमाई फुलेंसारखेच प्रेरणादायी आणि समाजासाठी मार्गदर्शक ठरले आहे. सावित्रीमाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी अविश्रांत प्रयत्न केले,तसेच सामाजिक परिवर्तनासाठी मोठे योगदान दिले. तशाच प्रकारे गुरुजींना सुमनआई मोहेकर यांनी ग्रामीण भागातील मुला-मुलांना आणि दुर्लक्षित समाजाला शिक्षण, सक्षमीकरण आणि स्वाभिमान मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे. गुरुजींनी युवकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करण्यासाठी मोठे प्रयत्न केले.त्यांनी गावागावांमध्ये जाऊन युवकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, त्यासाठी शाळा सुरू केल्या आणि महिलांना रोजगारक्षम बनवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक युवकांनी आपले जीवन बदलले. सावित्रीमाई फुलेंप्रमाणेच, सुमनआई यांनीही शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार केला आहे.त्यांनी गावातील व परिसरातील मुलींना शाळेत पाठवण्यासाठी जनजागृती केली.विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करून जेवणाची व राहण्याची सोय केली.वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक स्वतः सुमनआई बनवत असत.वसतिगृहातील किराणा भरण्यासाठी स्वतःच्या अंगावरील दागिणे घहाण ठेवले पण विद्यार्थ्यांची उपासमार होऊ दिली नाही.महिलांना नव्या संधी मिळाव्यात यासाठी स्वयं-सहायता गट स्थापन करून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. सुमनआई मोहेकर यांचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नाही.त्यांनी जातीभेद,लिंगभेद आणि अज्ञानामुळे ग्रस्त असलेल्या समाजासाठी काम केले आहे.त्यांनी अनेक वेळा समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून संघर्ष करण्याकामी गुरुजींना मोलाची साथ दिली. सावित्रीमाई फुले यांचा वारसा पुढे नेत सुमनआई मोहेकर यांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे. त्यांनी विविध जातीय, धार्मिक आणि सांस्कृतिक अंतर मिटवून एकतेचा विचार रुजवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. सुमनआई मोहेकर यांचे कार्य सावित्रीमाई फुलेंच्या विचारसरणीचा आधुनिक आविष्कार आहे. त्यांच्या जीवनातून समाजासाठी झटणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा मिळते. शिक्षण, समानता, सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्या ग्रामीण महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरल्या आहेत.
सुमनआई मोहेकर यांचे जीवन हे दाखवून देते की एखाद्या विचारधारेला कृतीत उतरवण्यासाठी मनापासून प्रयत्न केले, तर समाज बदलवता येतो. त्यांनी सावित्रीमाईंच्या विचारांची शिकवण नव्या युगात रुजवून ग्रामीण महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण केले आहे. अशा या त्यागी आणि तपस्वी सुमनआई मोहेकरांच्या प्रथम स्मृतिदिनी साक्षी पावनज्योत परिवाराकडून विनम्र अभिवादन.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड