August 9, 2025

योजनेसाठी जमीन विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांनी संपर्क साधावा

  • धाराशिव (जिमाका) – अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन २००४-०५ पासून सुरू करण्यात आली आहे . या योजनेंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहीन कुटूंबांना ४ एकर जिरायती ( कोरडवाहू ) जमीन किंवा २ एकर बागायती ( ओलीताखालील ) १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येते.
    जिल्हयातील वरील घटकातील भुमिहीन कुटूंबांना जमीन १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हयात,तालुक्यात व गावांमध्ये जमीन उपलब्ध असणे आवश्यक आहे.त्यामुळे जिल्हयातील ईच्छुक शेतकऱ्यांनी शासनाने निश्चीत केलेल्या दरानुसार खालील कागदपत्रासह जमीन विक्रीचे प्रस्ताव कार्यालयास सादर करावे.
    कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेंअंतर्गत जमीन विक्री करणारा जमीन मालक यांनी सादर करावयाची कागदपत्रे /पुरावे पुढीलप्रमाणे आहेत अर्जदाराचा ( जमीन विक्री करणारा / जमीन मालक ) विहीत नमुन्यातील अर्ज,शेतजमीनीवर कोणताही बोजा नसल्याबाबत संबंधित तलाठी यांचे प्रमाणपत्र व सातबारा उतारा,संबंधित परिसरातील प्राथमिक,सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र,परिसरातील कृषी पतपुरवठा करणाऱ्या बँकेचे कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, प्रस्तावित विक्रीच्या शेतजमीनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याचा मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल,जिल्हा समितीपुढे सादर केलेल्या प्रस्तावातील शेतजमीन समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही याची शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यास जाणीव असल्याबाबतचे घोषणापत्र व जमीनीच्या खरेदी प्रक्रियेमुळे कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत व सदर जमीनीबाबत कोणत्याही न्यायालयात वाद सुरु नसल्याबाबत व विक्री प्रस्तावातील जमीन कुठेही गहाण नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या जमीन मालकाचे शपथपत्र,जमीन विक्रीच्या अर्जावर शेतजमीन विक्री करणाऱ्या व्यक्तिशिवाय कुटूंबातील दोन व्यक्तींच्या ( उदा.सख्खेभाऊ, पत्नी,मुले इत्यादी ) स्वाक्षऱ्या असाव्यात व त्याचे जमीन विक्रीबाबत ना हरकत प्रमाणपत्र असावे.
    तरी या योजनेसाठी जमीन विक्रीस इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी समाज कल्याण कार्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
error: Content is protected !!