धाराशिव (जिमाका)- राज्यात अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा रब्बी हंगाम २०२४ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून शेतीत विविध प्रयोग करण्यात येतात. त्यामाध्यमातून कृषी उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती,मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने ते नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करतील.यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल.तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.रब्बी हंगाम २०२४ मध्येही पिकस्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका,जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहेत . त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी,गहू, हरभरा,करडई व जवस या ५ पिकांसाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे . पीकस्पर्धेतील पीके : रब्बी पीके ज्वारी, गहू,हरभरा,करडई व जवस.पात्रता निकष : स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकन्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल . पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे . अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: विहित नमुन्यातील अर्ज ( प्रपत्र – अ ) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा,आठ – अ चा उतारा,जात प्रमाणपत्र ( आदिवासी असल्यास ) पिक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख पुढीलप्रमाणे आहे ज्वारी,गहू हरभरा,करडई व जवस – ३१ डिसेंबर २०२४ आहे.तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिक स्पर्धा निकाल -प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील . स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क : पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम ३०० रुपये राहील व आदिवासी गटासाठी रक्कम १५० रुपये राहील . बक्षिस स्वरुप : तालुका पातळीवर पहिले ५ हजार रुपये,दुसरे ३ हजार रुपये व तिसरे २ हजार रुपये,जिल्हा पातळीवर पहिले १० हजार रुपये, दुसरे ७ हजार रुपये व तिसरे ५ हजार रुपये आहे. राज्य पातळीवर पहिले ५० हजार रुपये,दुसरे ४० हजार रुपये आहे. वरील नमुद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत सहभागी व्हावे. पिक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधु भगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी