धाराशिव (जिमाका) – भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थ सहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात. सन २०२४-२५ साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.त्या संदर्भातील नियम,अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमूना संकेतस्थळावरुन उपलब्ध (download) करुन घ्यावा.
सन २०२४-२५ साठीच्या समान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत. (Matching Schemes) १) इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना यासाठी २५ लाख रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.या योजनेव्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.
सन २०२४-२५ साठीच्या असमान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत. (Non Matching Schemes) ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ,साधनसामग्री,फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यामध्ये फर्निचर खरेदीसाठी ४ लक्ष रुपये व इमारत बांधकामासाठी १० ते १५ लक्ष रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी २ लक्ष ५० हजार रुपये अर्थसहाय्य व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरणासाठी २ लक्ष रुपये.महोत्सवी वर्ष जसे ५०/६०/७५/२००/१२५/१५० वर्ष साजरे करण्यासाठी ६ लक्ष २० हजार रुपये व इमारत विस्तारासाठी १० लक्ष रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
राष्ट्रस्तरीय चर्चासत्र,कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य १ लक्ष ५० हजार रुपये,२ लक्ष ५० हजार रुपये व ३.लक्ष रुपये करण्यात येणार आहे.
बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बालकोपरा स्थापन करण्याकरीता ६ लक्ष ८० हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
शासनमान्य ग्रंथालयाने आपले अर्ज वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे.आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास ३० नोव्हेंबर-२०२४ पर्यंत पाठवावेत,असे आवाहन ग्रंथालय संचालक,ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,नगर भवन, मुंबई यांनी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना केले आहे.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक