August 9, 2025

पंढरीची वारी

  • मित्रांनो,वारी हा शब्द उच्चारल्या सोबत समोर येतात ते दिंडीत चालणारे लाखो वारकरी.विठ्ठलाच्या नामस्मरणात रंगून गेलेले वारकरी. देहू,आळंदी कडून पंढरीला पायी चालत खांद्यावरती भगव्या पताका घेऊन विठ्ठल नामस्मरण करत हातामध्ये टाळ,विना, घेऊन मृदंगाच्या तालावर विठ्ठल भक्तीत रममान होऊन ऊन, वारा,वादळ,पाऊस, झेलत चालणारा ते वारकरी.
    वारी म्हणजे वैष्णवांची मांदियाळी, वारी म्हणजे भक्तीची वारी,शक्तीची वारी,वैराग्य वारी,चैतन्य वारी,जात,धर्म,वंश,देश परदेशाच्या पलीकडे माणूस पण जपत विठ्ठलाचा महिमा भक्ती मार्ग सांगणारी ती वारी. प्रपंच करून परमार्थ कसा करावा हा विचार सांगणारी ती वारी, काम, क्रोध,मोह,माया,मध, मत्सर दंभ, अहंकार,यापासून मुक्त जीवन जगण्याचा मार्ग सांगणारी ती वारी. विठ्ठल नामात थकलेल्या भागलेला माणसाला ऊर्जा देणारी ती वारी. परब्रम्हाला हृदयात साठवून विठ्ठल विठ्ठल म्हणीत वाटचाल करायला लावणारी ती वारी. ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती देणारी ती वारी, परिवर्तनाच्या दिशेने विवेकि विचार घेऊन चालणारी ती वारी. सद्भावना,परोपकार, शिकवणारी ती वारी.
    खरंतर ही शतकोना-शतके चालत आलेली भक्ती संप्रदायातील भागवत धर्माच्या प्रचाराची ही वारी दरवर्षाला आषाढी आणि कार्तिकी यात्रेनिमित्त पायी चालताना पाहत असतो. लाखोंचा जनसमुदाय राम कृष्ण हरी, विठ्ठल माऊलींच्या,तुकोबा महाराजांच्या नावाचे नामस्मरण करत करत ही चालत असते.
    नाही भेदाभेद l नाही अमंगळ ll
    विश्व हे मंगल l वैष्णवते ll
    पंढरीची वारी l आहे माझ्या घरी ll
    आणिक न करी ll तीर्थवृत्त ll
    संतांनी आपल्या अभंगातून विठ्ठल भक्ती बद्दल खूप रचना केलेल्या दिसून येतात.भक्ती-भावाचा संगम म्हणजे विठ्ठल वारी.
    आई-वडिलांच्या सेवेत रममान झालेला भक्त पुंडलिक यांना भेटण्यासाठी विठ्ठल पंढरीत आले.असा संदर्भ आहे.आई-वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाला भेटण्याचा मोह पांडुरंगाला व्हावा. पुंडलिकाची भक्ती पाहण्यासाठी अतुर झालेला हा पांडुरंग जेव्हा पंढरीत येतो,तेव्हा पुंडलिक म्हणतो,थोडंसं थांबा.आई-वडिलांची सेवा सुरू आहे. ती संपली की तुम्हाला भेटायला येतो. मग पांडुरंग म्हणले मी कुठे उभा राहू? तेव्हा पुंडलिकाने एक वीट भिरकावली, आणि सांगितलं की ह्या विटेवर उभा रहा.आई-वडिलांची सेवा करून पुंडलिक विठ्ठलाला भेटायला गेले. पांडुरंगाची क्षम मागितली. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सुसंवाद झाला. तुझी मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी काय करू?असे विठ्ठलाने पुंडलिकास विचारले. तेंव्हा पुंडलिकानी सांगितलं देवा ह्या विटेवरी कायम उभे राहा. तेव्हापासून आत्तापर्यंत त्याच विटेवर 28 युगे होऊन गेली तरीही विठ्ठल तिथेच उभा आहे. आपण पाहत आलो आहोत. अनुभव घेत आलो आहोत. जगाच्या पाठीवरती एकच वारी ती म्हणजे विठ्ठलाची वारी. विविध देशातून या वारीचा अनुभव घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, माणसातलं माणूसपण नेमकं कसं बदलत जातं त्याची अनुभूती घेण्यासाठी माणसं येतात. अभ्यास करतात.संशोधन करतात. पीएचडी करतात. जगात सर्वात मोठी दिंडी म्हणून या संबोधले जात आहे.
    तेराव्या शतकातून ह्या वारीची परंपरा असल्याचे इतिहासकाराचे मत आहे. संत ज्ञानेश्वराचे वडील विठ्ठलपंत यांनी विठ्ठल वारी चालविलेला संदर्भ आहे.ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यामध्ये तो संदर्भ आढळतो.
    1680 च्या सुमारास संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायणबाबा यांनी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांची पादुका एकाच पालखीत ठेवून ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामघोशाचा जय जय कार करत पालखीची परंपरा चालू ठेवल्याचे दिसते.
    त्यानंतर 1835 च्या शतकामध्ये हैबतबाबा आरफळकर यांनी आळंदीपासून ही वारी सुरू केली. हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सरदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी विविध राजे महाराजे सरदार यांच्याकडून हत्ती,घोडे, साहित्य,साधने मागवली. आणि मोठा लवाजमा घेऊन वारीचे स्वरूप मोठ्या थाटामाटात केलेले दिसते.जरी पटका घातलेला घोडा,पालखी समोर चालणार. मागे पालखीरथ आणि मागे सर्व दिंड्या शिस्तबद्धपणे, नियोजनबद्धपणे चालू ठेवण्याची रीत हैबत बाबांनी सुरू केली.
    विठ्ठल भक्तीचे महात्म्य हे विविध संतांच्या ओव्या, अभंग,भारुडे,गवळणी यांच्या माध्यमातून दिसून येते.यामध्ये संत तुकाराम महाराज,ज्ञानेश्वर माऊली, संत निवृत्तीनाथ,संत सोपान काका, संत मुक्ताई, संत एकनाथ, गजानन महाराज, संत पुंडलिक, संत नामदेव, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत गोरोबा काका, संत सोपान काका, निवृत्ती महाराज, संत सखुबाई. संत भानुदास, संत एकनाथ,अशा अनेक संतांनी आपल्या ओव्या, अभंग,गवळणी,भारुडे यांच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा महिमा शब्दबद्ध केल्याचे दिसून येते.
    हा आषाढी-कार्तिकीचा भक्ती सोहळा 1832 नंतर दोन पालख्यामध्ये विभागणी करण्यात आला.
    त्यामध्ये संत तुकाराम महाराजांची एक पालखी आणि दुसरी संत ज्ञानेश्वरांची.असे दोन स्वतंत्र मार्ग तयार करून स्वतंत्र दिंड्या दोन रस्त्याने पंढरपूरकडे जातात. एकूण महाराष्ट्रामध्ये 200 ते 250 पालख्यांच्या माध्यमातून आठ ते दहा लाख वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीला जात असतात.
    मित्रांनो वारकरी होण्यासाठी खूप सोपा मार्ग आहे. हरिभक्ताकडून तुळशीची माळ गळ्यात घालून घेणे.आई-वडिलांची सेवा, मुखी पांडुरंगाचं नाव, वाईट कृत्यापासून दूर राहणे. व्यसनापासून दूर राहणे. वर्षभरातल्या किमान एक वारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणे. एवढा साधा सोपा विठ्ठल भक्तीचा किंवा वारकरी होण्याचा मार्ग आहे.इथे धर्म,जात,उंच, नीचिता बाजूला सारून भागवत धर्माची साधी सोपी परंपरा आहे.हजारो वर्षापासून चालत आल्याचे दिसते. इथे उपवास,तप,साधना,यज्ञ, वृत्त,वैकल्य याची गरज नाही.फक्त मुखी विठ्ठलाचं नाम घ्यावं. चांगलं कार्य करावं.आणि चांगलं जगता यावं.प्रपंच करून परमार्थ करता यावा. हाच मार्ग भागवत धर्मामध्ये संत संप्रदायामध्ये सांगितलेला आहे.
    ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस.
    या अभंगाच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा महिमा साधुसंतांच्या विचारातून पुढे वाढत गेल्याचे दिसते.आषाढी कार्तिकीच्या दिंड्यांमधून लाखो भाविक भक्त भजन,कीर्तन, गवळणी, रिंगण, फुगडी विविध भक्तिमार्गातून विठ्ठलाचे नामस्मरण करत करत त्या पंढरीला जात असतात.
    चंद्रभागेच्या पवित्र जलामध्ये स्नान करून पंढरीचे दर्शन घेऊन या सर्व दिंड्या पुन्हा परतीचा प्रवास सुरू करतात.
    थकलेल्या भागलेल्या जीवाला ईश्वर भेटीचा आनंद मिळून जातो. आणि पुन्हा हे संत वारकरी आपापल्या प्रपंचामध्ये रमून जातात.
    महाराष्ट्र मध्ये प्रत्येक गावामध्ये देऊळ आहे. यामध्ये विठ्ठल रुक्मिणी, राम, कृष्ण, मारुतीची देवलये आहेत.अशा विविध देवालयामध्ये भजन,कीर्तन,भूपाळी,अभंग,गवळण,भारुड असे कार्यक्रम नेहमीच चालत असतात. प्रत्येक एकादशी दिवशी कीर्तनाचे कार्यक्रम होतात.
    या विठ्ठल भक्ती मध्ये कोणी उच नाही.कोणी नीच नाही.सर्व जाती, सर्व धर्म समान मानून प्रत्येकाला विठ्ठलाचे नाम घेण्याचा,भक्ती करण्याचा दर्शन घेण्याचा अधिकार मिळालेला आहे. म्हणून याच विठ्ठलाला बुद्धाचे प्रति स्वरूप म्हटले जाते. चला आपणही विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये आपल्या आयुष्यातली काही क्षण घालऊ.
    आणि एक वारी चालू.
    राम कृष्ण हरी.
  • मंथन -भूमिपुत्र वाघ
error: Content is protected !!