मुंबई – नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कालबाह्य संपलेल्या औषधांचा साठा आढळून आला आहे. या प्रकरणात जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमण्यात आलेली असून संबंधितांची सखोल चौकशी करण्यात येईल. या चौकशीत दोषी आढळलेल्या संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कालबाह्य औषधांचा साठा आढळून आल्याबाबत सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना श्री.सावंत बोलत होते.
खापर प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध साठा प्रकरणात तातडीने औषध वितरण थांबवण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिल्या होत्या. तसेच कालबाह्य औषध घेतले त्या मुलांची तपासणी केली असता त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास, अपाय झाल्याचे आढळून आले नाही.
औषधांची सुरक्षितता तपासणी करण्यासाठी औषधे तातडीने अन्न औषध प्रशासन तसेच गुणवत्ता व नियंत्रण यंत्रणेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे. तपासणी अहवाल तसेच चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यामध्ये दोषी आढळलेल्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य मंत्री श्री.सावंत यांनी यावेळी सांगितले.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यावेळी अधिवेशन संपण्याआधी अधिकाऱ्याची चौकशी करुन अहवाल सादर करावा, दोषी आढळल्यास कारवाई करण्यात यावी, असे सूचित केले.
More Stories
आंबडवे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा – राज्यमंत्री योगेश कदम
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन
अक्षय ढगे यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथे सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती