धाराशिव (जिमाका):-जिल्हयात मागील दोन-तीन वर्षापासून पावसाची सुरुवात लवकर होऊन पाऊस दिर्घकाळ पडत असल्याने ( नोव्हेंबर-डिसेंबरपर्यत ) गोगल गायीस पोषक वातावरण निर्माण झाले होते.साधारणत: सात ते आठ महिने जमिनीत ओलावा राहत असल्याने गोगलगायींच्या पिढयांमध्ये वाढ झाली व परिणामी गोगलगायींची संख्या भरमसाठ वाढली. जिल्हयात खरीप 2022 मध्ये 3802.3 हेक्टर क्षेत्रावर व खरीप 2023 मध्ये 4578.95 हेक्टर क्षेत्रावर पिकांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव होऊन बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावर्षीचे हवामानही किडीस पोषक असुन या खरीप हंगामातही गोगलगायींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सोयाबीन व कापसासारख्या पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतक-यांच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोगलगायींना वेळीच ओळखून त्यांच्या नियंत्रणासाठी तात्काळ पुढीलप्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक उपाय- उन्हाळयात जमिनीची खोल नांगरट करावी. जेणेकरुन गोगलगायींच्या सुप्तावस्था नष्ट होतील.शेतकऱ्यांनी मे महिण्यात पुर्वी प्रादुर्भावित सर्व क्षेत्रातील शेतात 1 ते 2 फुटाचे चर काढावेत जेणेकरुन गोगलगायीला जाण्यास प्रतिबंध करता येईल.गोगलगायींचे वास्तव्य मुख्यत: बांधावरील गवतावर असल्याने शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत. शेताची आडवी उभी नांगरट करुन सुप्तावस्थेतील गोगलगायींना जमिनीच्या पृष्ठभागावर आणावे म्हणजे त्या सुर्याच्या उष्णतेने मरतील व पक्षी त्यांचे भक्षण करतील. फळबागेमध्ये झाडाच्या खोडास 10 टक्के बोर्डोपेस्ट ( 1 किलो मोरचुद + 1 किलो चुना 10 लिटर पाण्यात ) लावल्यास गोगलगायी फळबागेतील झाडावर चढत नाहीत. विविध ठिकाणी असलेल्या बोर्ड, भिंती, भेगा, दगडे, बांध, नदी, नाले, ओढे, ओहठ, कालवा, पांदन किंवा पाणी साचलेला सखल भाग या ठिकाणी गोगलगायी सुप्तावस्थेत असतात.त्या जमा कराव्यात साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवुन माराव्यात. अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक,मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा.असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश