March 26, 2026

श्रीमती सरला खोसे मॅडम एक कर्तव्यदक्ष शिक्षीका

  • 30 एप्रिल 2024 या दिवशी आमच्या संस्थेच्या शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष मॅडम आदरणीय मुख्याध्यापिका श्रीमती खोसे पाटील सरला दादासाहेब उर्फ सरला दिनकरराव खोसे यांच्या सेवापूर्ती निमीत्त हा लेख.
  • ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्याविकास हायस्कूल कन्हेरवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणाहून त्या आज सेवानिवृत्त होत आहेत. सरला मॅडम म्हणजे आमची सखी, एक उत्कृष्ट गृहिणी एक प्रेमळ सहकारी, विद्यार्थी प्रिय शिक्षिका, उत्कृष्ट खेळाडू, दानशूर महिला होय. मॅडमनी संस्थेच्या वेगवेगळ्या शाखेत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तुत्वाचा त्यांनी ठसा उमटवला आहे. अबोल मितभाषी शांत वाटणाऱ्या मॅडम कधी मैत्रीण झाल्या ते कळालेच नाही. स्वतःच्या घराण्याचे वलय असूनही साध्या सिम्पल राहणीमानाच्या त्या लाडक्या बनल्या. विद्याभवन हायस्कूलच्या प्रांगणात त्यांचा सहवास मला पंधरा वर्षे लाभला. दहावीला उत्कृष्ट अध्यापन करणे, व्याकरण शिकवणे काटेकोर पेपर तपासणी त्यांच्या कामाचा भाग होता . विद्याभवन हायस्कूलमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताखाली मराठी मायबोलीचे धडे गिरवले. एक प्रेमळ सहकारी एक प्रेमळ आदर्श शिक्षिका म्हणजे खोसे मॅडम होय. इयत्ता दहावी अ वर्गाचे वर्गशिक्षिका पद त्यांनी आनंदाने स्वीकारले.
    मुलींना त्यांचा कायम धाक वाटायचा. विद्यार्थी अनेक समस्या घेऊन यायचे त्या सोडवण्यापासून, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या पार पाडायच्या. पर्यवेक्षक पद असो की उपमुख्याध्यापिका, शिक्षिका व मुख्याध्यापिका त्यांच्या कामाची पावती आहे. त्या बीए बीएड आहेत. सासरी सधन कुटुंब असूनही त्यांनी कधी आपला बडेजाव दाखवला नाही. वाचन लेखन भाषण व सांस्कृतिक कार्यक्रमाची त्यांना प्रचंड आवड आहे. बोलताना त्या आध्यात्मिक संस्काराचे महत्त्व अधोरेखित करतात. समाजामध्ये आपल्या कार्याला त्या वाहून घेतात. समाजसेवा ही त्या करतात. प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या खोसे मॅडम दोन दिवस रजेवर असल्या तर विद्यार्थी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायचा. अतिशय नीटनेटके राहणीमान उंचपुऱ्या गोऱ्यापान मॅडम मृदू आवाजात धडा कविता शिकवायच्या. खूप बौद्धिक उंची असल्यामुळे त्यांचा आम्हाला हेवा वाटायचा. आणखी एक छंद सर्वांसोबत त्यांचे पारंपारिक नाते त्या जोडायच्या. प्रत्येकाला मॅडम चांगलं वागवायच्या. आज त्या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. त्यांच्या हातून ज्ञानाची विद्येची सतत सेवा घडो हीच प्रार्थना. त्यांचे पुढील आयुष्य चांगले निरोगी जावो त्यांची समाजसेवा, दानशूरपणा वाढत जाओ.
  • सुरुवातीला मॅडम लातूरला कार्यरत होत्या जवळपास 13 वर्षे सेवा लातूरच्या लेबर कॉलनीच्या श्री. शिवाजी विद्यामंदिर शाळेत त्यांनी दिली त्याचे कारणही तसे आहे ! नियतीने दिलेल्या आघातामुळे त्यांना लातूर हे शहर गाठावे लागले परिस्थितीला किती संयमाने सामोरे जावे हे त्यांच्याकडून शिकावे. दयेचा सागर असणाऱ्या मॅडम पुस्तकाशी जास्त मैत्री करतात अंध – अपंग विद्यार्थ्यांना मदत करतात. लातूरच्या मागास भागातील त्याकाळच्या वातावरणात त्यांनी मन लावून अध्ययन अध्यापन केले आहे. शालेय वातावरण तयार केले आणि अपंग मुला-मुलींना मनाचे श्लोक, अध्यात्मिक संस्काराने प्रभावित करून शिक्षणाच्या प्रवाहात आणले. पत्र्याच्या खोलीत असणारी शाळा त्यांच्या समोरच टोलेजंग इमारतीत रूपांतरीत झाली. त्यांना बार्शीचे पाटील सर, डांगरे मॅडम, गायकवाड सर, बी.बी. माने सर, गुंजाळ नाना सर हे जीवाभावाचे सहकारी लाभले. सन 1995 ते 2007 या कालावधीत त्या लातूरच्या शाळेत आदर्श शिक्षिका म्हणून घडल्या. त्यांची ही मनस्वी धडपड बघून अखिल भारतीय सत्यशोधक समाज, लातूरचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळाला.
    सन्मानाच्या धनी सन्मानपत्र घरी !
    ज्ञानाची ज्योत म्हणजे मॅडम होय !!
    पुढे जाऊन त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाची दखल घेऊन ज्ञान प्रसारक मंडळाचा या संस्थेचा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुण गौरव पुरस्कार त्यांना मिळाला. स्वयंसेवी संस्थेला गुप्तपणे दान देणे हा दानशूरपणा त्यांच्याकडे आहे. गुप्तदानाची त्या कुठेही वाच्यता करत नाहीत. सांस्कृतिक पातळीवरील मानाचा दैनिक लोकमत या अग्रगण्य पेपरचा लोकमत सखी मंचचा श्रीमती लातूर हा पुरस्कार २००६ हा त्यांना मोठ्या गटातून नैपुण्यासह मिळाला.
    आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्यांची कृती बोलकी असते. त्यात कुठेही मी पणाला थारा नसतो. शाळेत पूर्णपणे रममान होणाऱ्या मॅडम कालांतराने आपल्या सासरी म्हणजे कळंबला आल्या. संस्थेच्या नावाजलेल्या विद्याभवन हायस्कूल या शाळेत दाखल झाल्या. त्या येणार म्हणून आम्हाला त्यावेळी कोण कुतूहल वाटायचे. सधन कुटुंबातील असल्याकारणाने त्या कशा वागतील ? काय बोलतील ? याची जास्त दबक्या आवाजात चर्चा रंगाची. पण मॅडम आमच्याशी कधी एक रूप झाल्या ते कळालेच नाही. इतक्यां निगर्वी आदर्श बाई म्हणजे खोसे मॅडम होय ! सतरा वर्ष वर्गशिक्षिका म्हणून दहावीला त्यांनी अध्यापन मराठी या विषयाचे केले आहे. मराठी विषयाच्या अध्यापनाची निकालाची परंपरा ही जिल्ह्यात जोपासली आहे. पुढे संस्थेने त्यांचा कार्याची दखल घेऊन मुख्याध्यापक पदावर पदोन्नती कन्हेरवाडी या गावी दिली. त्या आमच्यातून जाताना आम्हाला खूप वाईट वाटले, विद्यार्थी रडू लागले, प्रश्नाचा मारा करू लागले पण म्हणतात ना भावनेपेक्षा कर्तव्यश्रेष्ठ असते. मॅडम जिथे जातील तिथे प्रेम निर्माण करतील ही त्यांची खासियत होय. कन्हेरवाडी सारख्या ग्रामीण भागात त्या प्रथमच गेल्या. त्यामुळे त्यांना थोडे दडपण होते. पण तेथील वातावरणात एकरूप झाल्या. तोंडातून तक्रारीचा कधीही चकार शब्द ही काढला नाही. तेथील गाव – गावकरी, मुलं – मुली, सहकारी, मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या मावशी यांना त्यांनी जीव लावला. शाळेत अल्पावधीतच वृक्ष संवर्धन, परिसर स्वच्छता, शालेय शिस्त, वृक्षारोपण यावर त्यांनी भर दिला. दहावी सराव परीक्षा कॉपीमुक्त घेतल्या. प्रथमच ग्रामीण भागात गेल्या तरी त्या डगमगल्या नाहीत. मुला – मुलींना दहावी बोर्डाच्या केंद्रावर स्वतः पोहोचवायला जात. अडीअडचणी मायेने सोडवत. अत्यंत लाघवी स्वभावाच्या मॅडम गावात प्रसिद्ध झाल्या. असे दुर्लभ प्रेम सध्या क्वचित कोणाच्या वाट्याला येते. मॅडम भाग्यवान आहेत नेहमी कौतुक त्यांच्या वाट्याला येते.
  • सुरुवातीला त्यांना ग्रामीण भागाची भीती वाटली पण त्यावर त्यांनी मात केली त्यांना पितृतुल्य शालेय समिती अध्यक्ष लालासाहेब बापू कवडे, अशोकराव कवडे, सावंत नाना, सहकारी वर्गातून माळी सर, कुमरे सर, मोरे सर, अमरसिंह देशमुख सर, सेवक जेवे मामा, सावंत मामा -मामी यांनी सहकार्य केले कन्हेरवाडीच्या विद्यार्थ्यांच्या खूप आठवणी त्यांना येत राहतील इतके प्रेम त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केले. म्हणतात ना चांगल्या व्यक्तीला कशाची कमतरता नसते. त्यांच्या साजेशा व्यक्तिमत्वाला आणखी संधी चालून आली. राजकारण – समाजकारण, शैक्षणिक विकास यासाठी त्यांनी एकल महिला निराधार गरजू महिला समाजातील गरिबांना साहाय्य करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गटाच्या) धाराशिव जिल्हाध्यक्ष म्हणून सरला खोसे मॅडमची निवड झाली. ती निवड डॉ .पद्मसिंह पाटील यांच्या घराण्याशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे झाली. पूर्वीपासूनच सासर राष्ट्रवादी घराण्याचे असल्यामुळे झाली. या कामी सुरेश दाजी बिराजदार उमरगा महेंद्र काका धुलगुडे उमरगा, महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा अध्यक्षा माननीय रूपालीताई चाकणकर मॅडम मुंबई यांनी त्यांची ही निवड केली. मला वाटतं हा खोसे मॅडमच्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण आहे.
  • मॅडमचा जन्म 01/05/ 1966 रोजी झाला. मॅडमचे शिक्षण पहिली ते चौथी देवळाली तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी झाली पाचवी ते दहावीचे शिक्षण महाराष्ट्र विद्यालय बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी झाली तिथे त्यांना कर्मवीर जगदाळे मामा यांचा सहवास लाभला. अकरावी ते बारावी शाहू महाविद्यालय लातूर या ठिकाणी शिक्षण झाले पदवीचे शिक्षण कळंबला झाले. बीएडचे शिक्षण लातूरला झाले सरला मॅडमला वाचन, बागकाम, अध्यापन याचा छंद आहे.
  • वयाच्या 19 व्या वर्षी त्यांचे लग्न एका सधन कुटुंबात झाले. सासरी चार वर्षाच्या संसारात त्या रममाण असताना अचानक नियतीने त्यांच्यावर आघात केला व त्यांचे छत्र हरवले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सगळं खायला उठलेला असताना रणजीत या आपल्या मुलाच्या रूपाने त्यांच्या जगण्याच्या अशा पल्लवीत झाल्या. सुन प्रा. सौ. प्रणिता, नात श्रीशा, सायशा, दिया व माया यांच्या रूपाने त्या सह जीवनाचा आनंद घेत आहेत. मुलगी सौ अश्विनी देवरे पाटील धुळे पुतणे अजय खोसे अमेरिका, सून डॉक्टर दीप्ती अजय खोसे अमेरिका, या त्या रममाण आहेत. काळाने दु:ख दिले पण काळाला मॅडमने हरवून जगायला शिकवले आहे. रडूबाई म्हणून त्या घरात बसल्या नाहीत. समाजासाठी जगायला त्यांना आवडते. साध्यासुध्या सौ. विमलबाईच्या पोटी जन्माला आलेले हे रत्न आज चार बहीण व एक भाऊ आणि सौ जयश्री भास्कर खोसे जाऊ बाई, कौशल्या संदिपान जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आहे. खूप वलय असूनही साध्या राहणाऱ्या मॅडम आदर्श जीवन जगतात. त्यांना ईश्वराने भरभरून द्यावे ही प्रार्थना.
  • शिक्षण कार्याला एखाद्या योग्या प्रमाणे उदात्त व निस्वार्थ भावनेने वाहून घेणाऱ्या मॅडम ज्ञानाचे कर्तुत्वाचे दीपस्तंभ प्रमाणे कार्य करतात. गरीब वंचित सर्वसामान्यांच्या कुटुंबातील मुलांना सांभाळतात.
  • जिथे श्रमाने गळतो घाम ! तिथे नांदतो माझा राम !!
    कोण मी अन काय माझी जात आहे !
    एक अधुरा कर्ण माझ्या आता आहे !!
    जीवनात तुझेच मी गीत गात राहिले !
    सावली दिली तुला मी उन्हात राहिले !!
    अशा मॅडमला ईश्वराने भरभरून आयुष्य द्यावे हीच प्रार्थना.
    शेवटी मला लिहावे वाटते …
  • शब्द माझ्या जाणिवेची हार आहे !
    मौन माझ्या चेतनेचे सार आहे !!
    आसवांचे वाजवी संतूर जगणे !
    जीवनाचा हाच तर झंकार आहे !!
    जाणिवेचा शब्द माझे लक्ष बनला !
    चित्त माझे एक सावध घार आहे !!
    काळजाचा तळ मला सांगून गेला !!
    काच माझी आरसा होणार आहे !
    मी कधीची शोधत आहे चराचर !
    कोणते आभाळ माझे दार आहे ,?
    तू कितीही पाहिजे ती कर चलाखी !
    शेवटी हा काळ !
    एक जादूगार आहे ….
    एक जादूगार आहे. !!!

  • सौ. अलका विजय टोणगे
    सह. शिक्षीका,
    विद्याभवन हायस्कूल, कळंब.
    संपर्क – ९४२०७७०४८०
error: Content is protected !!