April 25, 2026

“कामगार चळवळीचा कणखर आधारवड हरपला” — अच्युतराव माने पाटील यांचे निधन

  • कळंब – तालुक्यातील शिंगोली येथील रहिवासी तसेच महाराष्ट्र गुणवंत कामगार असोसिएशनचे प्रदेश सचिव अच्युतराव माने पाटील (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने दि.२५ एप्रिल रोजी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
    अच्युतराव माने पाटील यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत कामगार व ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी अविरत संघर्ष केला. राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत कार्यरत असताना त्यांनी इंटक संघटनेचे धाराशिव विभागीय सचिव म्हणून प्रभावी काम केले.त्यानंतर महाराष्ट्र गुणवंत कामगार असोसिएशनचे प्रदेश सचिव म्हणून त्यांनी कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा दिला.
    सेवानिवृत्तीनंतरही त्यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली.त्यांनी ईपीएस-९५ सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे कळंब तालुका अध्यक्ष म्हणून कार्य करत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानजनक पेन्शन मिळावी यासाठी मोठा संघर्ष उभारला.तसेच संघर्ष एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
    कामगार व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना “गुणवंत कामगार” पुरस्कारासह विविध सामाजिक संस्थांकडून सन्मानित करण्यात आले होते.
    त्यांच्या पश्चात भाऊ,पत्नी, मुलगा,मुलगी,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर बार्शी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
    साक्षी पावन ज्योत परिवाराच्या वतीनेही अच्युतराव माने पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
error: Content is protected !!