कळंब – तालुक्यातील भोसा गावातील विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून एस.टी. बस सेवेअभावी शिक्षणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. सध्या सुमारे ५० विद्यार्थी दररोज गौर,कळंब व धाराशिव येथे शिक्षणासाठी जात असले तरी नियमित बस सुविधा नसल्यामुळे त्यांना पायी अथवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.यामुळे वेळ,खर्च तसेच सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर बनले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कळंब तालुकाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे यांनी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगार प्रमुखांकडे निवेदन सादर केले आहे.या निवेदनात कळंब-भोसा मार्गावर नियमित एस.टी.बस सेवा सुरू करावी तसेच कळंब-गौर-धाराशिव या मार्गावरील बस भोसा येथे वळवावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने बस सुविधा अत्यंत महत्त्वाची असून विशेषतःउन्हाळा व पावसाळ्यातील कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. सुरक्षित प्रवासाच्या अभावामुळे अनेक विद्यार्थिनींना शिक्षण सोडण्याची वेळ येत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन भोसा येथे एस.टी. बस सेवा सुरू करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ होऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्याला चालना मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी शहराध्यक्ष मुसादिक काजी,अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष जिकराईल पटेल,सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष चेतन वाघमारे, कळंब तालुका सचिव वाहेद पटेल,भिवाजी ताकपीरे आदी उपस्थित होते.
More Stories
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
सिद्धांत नगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य डिजिटल कमान व CCTV कॅमेऱ्यांचे लोकार्पन उत्साहात
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढी-परंपरांना छेद देत शिक्षणातून समतेचा मार्ग दाखविला – सोपान पवार