* ॲट्रॉसिटीच्या १८१ पीडितांना २ कोटी ४९ लक्ष रुपये वाटप
* स्वाधारचा १३४८ विद्यार्थ्यांना लाभ
* शिष्यवृत्ती योजनेचे ६१०२ विद्यार्थ्यांना ९ कोटी ७८ लक्ष रुपये वितरीत
धाराशिव (जिमाका) – समाजातील वंचित,गरजू आणि विशेषतः अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय धाराशिव यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत आहे.शिक्षण,आर्थिक सहाय्य,निवास व्यवस्था आणि न्याय मिळवून देण्याच्या माध्यमातून समाज कल्याण विभाग केवळ योजना राबवत नाही,तर अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहे. सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय धाराशिव या कार्यालयामार्फत जिल्हयामध्ये सन २०२५-२६ मध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थी व इतर लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे योजनानिहाय लाभ देण्यात आलेला आहे. धाराशिव जिल्हयामध्ये अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अर्थात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत खून प्रकरणातील एकूण ९ पिडितांच्या वारसांना गट-ड या संवर्गामध्ये शिपाई, मदतनीस,पहारेकरी,सफाईगार इ.पदावर कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालयामध्ये शासकीय नोकरी देण्यात आलेली असून याद्वारे त्यांचे कुटुंबियांचे अंशतः दुख दुर करण्याचा प्रयत्न शासनामार्फत करण्यात आलेला आहे.तसेच या कायद्याअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये गुन्ह्याच्या स्वरूपानुसार १८१ लाभार्थ्यांना रक्कम २ कोटी ४९ लक्ष ५८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आलेले आहे. या उपक्रमांमधून केवळ आर्थिक मदतच नव्हे,तर अन्यायग्रस्त कुटुंबांना मानसिक आधार देण्याचा आणि त्यांना पुन्हा उभे राहण्याची संधी देण्याचा संवेदनशील प्रयत्न दिसून येतो. जिल्हयामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी एकूण ११ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून त्यामध्ये ७३९ विद्यार्थी प्रवेशित आहेत.ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेला असून त्यामध्ये अभ्यासक्रमानुसार ४० हजार ते ४८ हजार रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात आला आहे.सन २०२५-२६ मध्ये एकूण १३४८ विद्यार्थ्यांना ७ कोटी ८१ लक्ष २३ हजार रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत,यासाठी स्वाधार योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे हे सहाय्य अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारे ठरत आहे. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजने अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील एकूण ६१०२ विद्यार्थ्यांना ९ कोटी ७८ लक्ष ९३ हजार २४३ रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे. ही शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना पंख देणारी ठरत असून,अनेक विद्यार्थ्यांना आपले करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात ३ शासकीय निवासी शाळा कार्यरत असून त्यामध्ये इयत्ता ६ वी ते १० वी चे एकूण ४१९ विद्यार्थी शिक्षण घेत आहे.या विद्यार्थ्यांना निवास,भोजन,शैक्षणिक साहित्य व इतर सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.या निवासी शाळांमुळे ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना सुरक्षित,शिस्तबद्ध आणि सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण मिळत आहे. समाज कल्याण विभागाच्या या विविध योजनांमधून शिक्षण,संरक्षण आणि सक्षमीकरणाचा त्रिसूत्री दृष्टिकोन दिसून येतो.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि गरजू कुटुंबांना मिळणारा आधार हा समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.
More Stories
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान
‘मधुमित्र–मधुसखी’ पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत अर्ज मागविले