April 13, 2026

धाराशिव येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळा

  • धाराशिव (जिमाका)– धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि.१२) आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध बक्षिसे व पुरस्कारांचे वितरण होणार आहे.यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, रोहयो मंत्री भरत गोगावले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
    धाराशिव शहरातील नगर परिषदेजवळील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रविवारी सकाळी ११ वाजता हा सोहळा पार पडणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक असणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून रोहयो व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, ‘मित्रा’ (Maharashtra Institution for Transformation) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी,माजी मंत्री आ.डॉ. तानाजीराव सावंत,आ. राणाजगजितसिंह पाटील,आ. कैलास घाडगे पाटील,आ.प्रविण स्वामी तसेच माजी आ.ज्ञानराज चौगुले उपस्थित राहणार आहेत.
    या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘पुण्य पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
    सहकार क्षेत्रातील कार्यासाठी धाराशिव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष हभप वसंतराव नागदे,उद्योग क्षेत्रासाठी रुपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड,वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रासाठी सह्याद्री हॉस्पिटल व अंकुर शिशुगृहाचे प्रमुख डॉ.दिग्गज दापके-देशमुख,महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अर्चना माने,शिक्षण क्षेत्रातील आदर्श कार्यासाठी कसबे तडवळे (ता. धाराशिव) येथील शिक्षक बाळासाहेब जमाले, व्यसनमुक्ती क्षेत्रासाठी येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ.संदीप तांबारे,प्रगतशील शेतीसाठी तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील शेतकरी हणमंत गवळी,पोल्ट्री व्यवसायासाठी पार्डी (ता.वाशी) येथील उद्योजक विठ्ठल चौधरी तसेच आदर्श सरपंच म्हणून जकेकुरवाडी (ता. उमरगा) येथील अमर सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
    याचवेळी कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कारांचे वितरणही करण्यात येणार आहे.शोधवार्ता गटात प्रथम बालाजी पांडुरंग वडजे (उमरगा), द्वितीय अमोल भास्कर मुळे (बीड),तृतीय राजहंस तुकाराम कांबळे (उदगीर,जि.लातूर) व रोशन मुल्ला (उदगीर,जि.लातूर) यांना सन्मानित करण्यात येईल.विशेष वार्ता गटात प्रथम माधव आटकोटे (नांदेड),द्वितीय रमेश अर्जुन कदम (हिंगोली),तृतीय दीपक लिंबराज बारकुल (येरमाळा, जि. धाराशिव) तसेच डॉ.रविंद्र भताने (चापोली, जि. लातूर) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
    या बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक ‘पुण्य नगरी’चे जिल्हा वृत्त संपादक धनंजय रणदिवे,सरचिटणीस संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य,कोषाध्यक्ष संतोष हंबीरे,उपाध्यक्ष अब्बास सय्यद (भूम) व श्रीकांत कदम (तुळजापूर) यांनी केले आहे.
error: Content is protected !!