April 10, 2026

मे महिन्यात तुळजाभवानी मंदिर विकासाचा शुभारंभ;१८६५ कोटींच्या आराखड्याला वेग

  • मुंबई – कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर परिसराच्या भव्य विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विविध कामांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. हे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
    मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत बोलताना सरनाईक यांनी सांगितले की,राज्य शासनाने सुमारे १८६५ कोटी रुपयांच्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास मंजुरी दिली असून त्यापैकी ४२१ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या १०५ खाजगी मालमत्तांपैकी सुमारे ७५ टक्के मालकांशी शासनाने यशस्वी वाटाघाटी पूर्ण केल्या असून उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे.
    या बैठकीस आमदार राणाजगजीतसिंह पाटील, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजारी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
    पालकमंत्री सरनाईक यांनी तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास राम मंदिर अयोध्या च्या धर्तीवर भव्य व दिव्य स्वरूपात करण्यासाठी नियोजनबद्ध आणि वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यामध्ये मंदिर परिसरातील आठ प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, आठ कुंडांचे पुनरुज्जीवन, पार्किंग प्लाझा, प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण, भक्तनिवास आणि दर्शन मंडप उभारणी यांसारख्या कामांचा समावेश आहे.
    तसेच रामदरा तलाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी उद्यानाबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तुळजापूर शहराचा वेगाने वाढणारा विस्तार लक्षात घेता शहरासाठी स्वतंत्र ‘मास्टर प्लॅन’ तयार करून सुनियोजित विकास साधण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या सर्व कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
    दरम्यान,महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत बोलताना छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी समाजात असलेला आदर लक्षात घेऊन स्मारक उभारणी शासनाच्या निकषांनुसारच व्हावी, असे त्यांनी नमूद केले.अनधिकृत पुतळे उभारण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समिती स्थापन करून इच्छुकांना योग्य मार्गदर्शन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
    या बैठकीत मंदिर विकास आराखड्यासोबतच मुख्यमंत्री शेतकरी सौर पंप योजना, जलसंपदा,मृद व जलसंधारण, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणीटंचाई आदी विषयांवर सविस्तर आढावा घेण्यात आला.संबंधित विभागांनी आपल्या कामकाजाची अद्ययावत माहिती सादर केली असून बैठकीनंतर तात्काळ कार्यवाही अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
error: Content is protected !!