April 5, 2026

अल्प पेन्शनवाढीसाठी EPS-95 सेवानिवृत्तांचा आवाज बुलंद; केंद्रीय श्रम मंत्र्यांना निवेदन

  • किमान ₹7500 पेन्शन व महागाई भत्त्याची मागणी; 36 लाख पेन्शनधारकांचा प्रश्न ऐरणीवर
  • कळंब – EPS-95 सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने अल्प पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडिया यांना निवेदन देण्यात आले.हे निवेदन कळंबचे उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्फत सादर करण्यात आले.
    या निवेदनाद्वारे अल्प पेन्शनमुळे वृद्ध पेन्शनधारकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.सध्या देशभरात सुमारे 36 लाखांहून अधिक EPS-95 पेन्शनधारकांना अत्यल्प पेन्शन मिळत असून, अनेकांना ₹1000 पेक्षाही कमी रक्कम मिळत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
    संघटनेने नमूद केले की,2013 मध्ये कोश्यारी समितीने किमान ₹3000 पेन्शन व महागाई भत्ता देण्याची शिफारस केली होती. मात्र 2014 मध्ये किमान पेन्शन केवळ ₹1000 निश्चित करण्यात आली आणि त्यात महागाई भत्त्याचाही समावेश करण्यात आला नाही. सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम अत्यंत अपुरी असून, पेन्शनधारकांना औषधोपचार करणेही कठीण झाले आहे.
    दररोज सुमारे 200 ते 250 वृद्ध पेन्शनधारक उपचाराअभावी मृत्यूमुखी पडत असल्याचा गंभीर मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला. गेल्या नऊ वर्षांपासून संघटनेच्या वतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असून, सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
    संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
    ▪ किमान ₹7500 पेन्शन व महागाई भत्ता लागू करावा
    ▪ EPS-95 पेन्शनधारक व त्यांच्या जोडीदारांना मोफत आरोग्य सुविधा द्याव्यात
    ▪ Supreme Court of India च्या 4 ऑक्टोबर 2016 व 4 नोव्हेंबर 2022 च्या निर्णयानुसार वास्तविक वेतनावर उच्च पेन्शनचा लाभ द्यावा
    ▪ गैर-EPS पेन्शनधारकांना किमान ₹5000 मासिक पेन्शन देण्यात यावी
    या निवेदनावर EPS-95 कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष अच्युतराव माने, रामभाऊ कवडे, उत्तरेश्वर शिंगणापूरे, अरुण गायकवाड, बशीर पठाण, प्रभुलिंग झोरी, ज्ञानदेव पारेकर, लक्ष्मण काळे, रामा सोनवणे, वैजनाथ पवार, प्रकाश भाकरे आदींच्या सह्या आहेत.
    या मागण्यांना ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, माधवसिंग राजपूत तसेच पत्रकार संदीप कोकाटे यांनीही पाठिंबा दर्शविला आहे.
error: Content is protected !!