कळंब – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कळंब-डिकसळ परिसरात मानवतेचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.कळंब येथील दयावान प्रतिष्ठानच्या वतीने मुक्या प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या सिमेंट टाक्या बसविण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळा दिवसेंदिवस वाढत असताना ग्रामीण व शहरी भागात भटक्या जनावरांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे.पाण्याच्या शोधात जनावरांची होणारी भटकंती आणि त्यातून निर्माण होणारी दयनीय अवस्था लक्षात घेऊन दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत कळंब व डिकसळ परिसरातील विविध ठिकाणी सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या बसविण्यात येणार आहेत.या टाक्यांमुळे जनावरांना सहज पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, त्यांच्या जीवनरक्षणासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.विशेष म्हणजे,हा उपक्रम केवळ एकदिवसीय नसून दीर्घकालीन स्वरूपाचा आहे. टाक्यांमध्ये सातत्याने पाणी उपलब्ध राहील यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान,ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे,अशाच ठिकाणी टाक्या बसविण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात पाण्याची सोय असल्यास पुढाकार घेऊन या उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष इम्रान मुल्ला व सचिव अभय गायकवाड यांनी सांगितले की, “मुक्या प्राण्यांच्या जीवनरक्षणासाठी हा एक छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे,” असे त्यांनी नमूद केले. टाकी बसविण्याबाबत इच्छुक नागरिकांनी इम्रान मुल्ला (मो. ९४२१८७३१११), अभय गायकवाड (मो. ९४०५१०१८८८) व इमरान काझी (मो. ९१७५७०४७८६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एकूणच,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजात करुणा,संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव दृढ करणारा ठरत असून,इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
More Stories
गुरु-शिष्य नात्याचा जिवंत आदर्श;परदेश दौऱ्यानंतर गुरुवर्य डॉ.मोहेकर यांचा शिष्याकडून भावपूर्ण सत्कार
आर.एस.पोल्ट्री फार्ममध्ये सदस्यांचा गौरव;रस्ते प्रश्न सोडवण्याचे आश्वासन
परमभक्तीनेच भगवंत प्राप्त – ह.भ.प.संदीपान महाराज हसेगांवकर