कळंब (माधवसिंग राजपूत) – भगवंताला आपलसं करण्यासाठी परमभक्ती आवश्यक असून,या भक्तीमुळे भक्त आणि भगवान यांचे अद्वैत नाते निर्माण होते. अहंकाराचा पूर्णपणे नाश होऊन भक्त भगवंतात विलीन होतो,हीच खरी अद्वैत अनुभूती आहे,असे प्रतिपादन ह.भ.प.ज्ञानसिंधू गुरुवर्य संदीपान महाराज हसेगांवकर यांनी केले. कळंब येथील कसबा पेठ भागातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे हनुमान जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी दि.२ एप्रिल २०२६ रोजी काल्याच्या कीर्तन सेवेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरीतील अभंग— “आपुलेनि भारे श्रीरंग डोलत गेले” “अवचिते पाचारिले पाठिमोरे” यावर सखोल विवेचन करत भगवंताच्या भक्तीचे महत्त्व स्पष्ट केले. महाराज पुढे म्हणाले की,जगात सत्ता आणि पैसा यांच्या जोरावर शासन किंवा समाज परिवर्तन होऊ शकत नाही.खरी परिवर्तनाची ताकद ही वारकरी संप्रदायात आहे.वारकरी संप्रदाय हा विश्वसंप्रदाय व्हावा,अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी बुवाबाजी व ढोंगीपणावर संतांनी केलेल्या टीकेचाही उल्लेख केला. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त तेर येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान,दुपारी १० ते १२ या वेळेत झालेल्या काल्याच्या कीर्तनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.कळंब येथे दि. २६ मार्च ते २ एप्रिल दरम्यान हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला.दि.२ एप्रिल रोजी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला.यावेळी भक्तांनी लाडू,पेढे आदी प्रसादाचे वाटप केले. या सप्ताहादरम्यान ह.भ.प. संदीपान महाराज हसेगांवकर यांचे काल्याचे कीर्तन,आचार्य विनोद शास्त्री महाराज (वृंदावन निवासी) यांची शिवपुराण कथा, नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा, तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. महाप्रसाद पंगतीचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी (आप्पा) कापसे व नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे यांच्या वतीने करण्यात आले होते.संपूर्ण सप्ताहात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत भक्तिमय वातावरणाची अनुभूती घेतली.
More Stories
आर.एस.पोल्ट्री फार्ममध्ये सदस्यांचा गौरव;रस्ते प्रश्न सोडवण्याचे आश्वासन
‘जय हनुमान तालीम संघा’चा सामाजिक उपक्रम;हनुमान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
“महिलांच्या नेतृत्वात साजरी होणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती”;कळंब आगारात जयंती समितीची घोषणा