March 21, 2026

कळंबमध्ये ‘चैत्रपालवी’ची सुरेल मैफल;विलास कुलकर्णींच्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध

  • कळंब – मराठी नववर्षाच्या आगमनानिमित्त कळंब नगरीत ‘चैत्रपालवी संगीत महोत्सवा’ची सुरेल पर्वणी रंगली.कलोपासक मंडळ,कळंब यांच्या वतीने कै.डि. के.कुलकर्णी सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या महोत्सवात सोलापूरचे ख्यातनाम शास्त्रीय गायक विलास कुलकर्णी यांच्या गायनाने उपस्थित रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
    गुढीपाडवा,गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता विठ्ठल मंदिर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी ब्रिगेडियर सुमंत दशरथ,चौधरी बप्पा,बालरोग तज्ञ डॉ.रमेश जाधवर,रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष डॉ.अभिजित जाधवर,बालभारती पाठ्यपुस्तक नियोजन समिती सदस्य सुशीलकुमार तीर्थकर,ॲड.मनोज चोंदे,माजी नगराध्यक्ष यशवंत दादा दशरथ आणि अनिल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
    विलास कुलकर्णी यांनी आपल्या सुमधुर आवाजात शास्त्रीय, उपशास्त्रीय,नाट्यगीत,अभंग व विविध रचना सादर करत रसिकांची मने जिंकली.त्यांच्या गायनाला प्रा.शशिकांत देशमुख (संवादिनी),तेजस धुमाळ (तबला) आणि हनुमंत कासलबादे (पखवाज) यांनी उत्कृष्ट साथसंगत दिली.
    कार्यक्रमादरम्यान प्रमुख कलाकारांचे स्वागत व सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.फ्रेंड्स फॉरेवर ग्रुपचे सचिव गोपाल उबाळे यांनी विलास कुलकर्णी यांचे स्वागत केले,तर तबला वादक तेजस धुमाळ यांचा जयवंत इटकुरकर, पखवाज वादक हनुमंत कासलबादे यांचा श्रीकांत कळंबकर यांनी सत्कार केला. कळंबचे सुपुत्र शशी देशमुख यांचा सन्मान काकासाहेब मुंढे यांनी केला.
    यावेळी विलास कुलकर्णी यांचे सुपुत्र व शिष्य गौरव कुलकर्णी यांचा सत्कार डॉ.अमित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच गोवा येथील गंधर्व महाविद्यालयात गायनाचे शिक्षण घेत असलेले कळंबचे रोहित पांचाळ यांचाही विशेष सन्मान मुख्याध्यापक संघ धाराशिवचे अध्यक्ष सुरेश (काका) टेकाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.गिरीष कुलकर्णी यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कलोपासक मंडळाचे यशवंत दशरथ,अनिल कुलकर्णी,विलास खांडेकर, अनिता कुलकर्णी,दिपाली कुलकर्णी,निशा कळंबकर,दर्शन पोरे,नरेश कुलकर्णी आणि वेदांत कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.
    या सुरेल मैफलीमुळे कळंबकरांना नववर्षाच्या स्वागताची अविस्मरणीय सांस्कृतिक मेजवानी लाभली. 🎶
error: Content is protected !!