धाराशिव (जिमाका) – सध्या जिल्ह्यात गॅस तसेच पेट्रोल-डिझेल टंचाईबाबत विविध अफवा पसरत असल्या तरी त्या पूर्णपणे निराधार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.केंद्र शासन व संबंधित इंधन पुरवठा कंपन्यांकडून राज्यात एलपीजी गॅस तसेच पेट्रोल-डिझेलचा पुरवठा नियमितपणे सुरू असून कोणतीही टंचाई नसल्याची खात्री देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सी तसेच पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसारच गॅस सिलेंडर बुकिंग करावे तसेच पेट्रोल-डिझेल खरेदी करावी. अनावश्यक गर्दी करून इंधन किंवा गॅस साठवून ठेवण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा व्यवस्थेवर ताण येऊ शकतो. गॅस सिलेंडरचे वितरण बुकिंगनुसारच करण्यात येणार असल्याने नागरिकांनी संयम राखणे आवश्यक आहे. तसेच पेट्रोल पंपांवर घाईगडबडीत रांगा लावणे, मोठ्या प्रमाणात इंधन साठवणे किंवा घबराटीचे वातावरण निर्माण करणे टाळावे. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी शांतता,शिस्त व संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे,असेही जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट केले आहे.
More Stories
जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष बैठक
एलपीजी गॅस,पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी समन्वय अत्यावश्यक;साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव जिल्हा पोलिसनामा