कळंब – कळंब शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शाळकरी विद्यार्थी,महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.शहरातील गल्लोगल्ली कुत्र्यांच्या झुंडी फिरताना दिसत असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरून पायी किंवा वाहनाने जाणेही धोकादायक बनले आहे. शहरातील विविध भागांमध्ये कुत्र्यांच्या टोळ्या अचानक नागरिकांच्या दिशेने धाव घेत असल्याच्या घटना घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.विशेषतःसकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी व संध्याकाळी घरी परतणाऱ्या महिलांना या परिस्थितीचा अधिक फटका बसत आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाच्या वतीने कळंब नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी,अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच श्वानपालकांनी आपले कुत्रे मोकाट सोडल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, कुत्र्यांचे लसीकरण व निर्बिजीकरणाची मोहीम राबवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात,अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,काही काळापूर्वी शहरात रस्त्यावर मोकाट जनावरांचा त्रास होता;मात्र आता मोकाट कुत्र्यांनीही नागरिकांचे जीवन त्रस्त केले आहे.अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी अचानक रस्त्यावर येऊन वाहनचालक व पादचाऱ्यांना घाबरवतात,त्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत,तर मराठा सेवा संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनावर मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रा.जगदीश गवळी,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल फाटक,सचिव अरविंद शिंदे तसेच संभाजी ब्रिगेडचे संघटक विलास गुंठाळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येमुळे नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
More Stories
धाराशिव जिल्ह्यात तातडीने दारूबंदी लागू करा; दारू मुक्ती आंदोलन महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कळंबमध्ये आनंद इलेक्ट्रिक मोटर्सचे उत्साहात उद्घाटन; पर्यावरणपूरक वाहनांच्या नव्या युगाची सुरुवात
रमजान निमित्त ‘एहसास’ची माणुसकीची उब;१५० राशन किट,सहरी टिफिन व रमजान टाइमटेबल कार्डचे वाटप