कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा – १) अंतर्गत महसूल मंडळ मस्सा (खं.) येथे आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दि.१४ मार्च २०२६ रोजी महादेव मंदिर सभागृह,मस्सा (खं.) येथे झालेल्या या शिबिरास तब्बल ६३३ नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. या शिबिरात महसूल,पंचायत समिती,कृषी,भूमी अभिलेख, एस.टी.महामंडळ,अन्न व नागरी पुरवठा,बँकिंग आदी विविध विभागांचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स पद्धतीचा अवलंब करण्यात आला. शिबिरामध्ये डिजिटल सातबारा १५८, ८-अ उतारे १३२ इतक्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले. तसेच फेरफार प्रकरणे ३४ निकाली काढण्यात आली. विविध प्रमाणपत्रांमध्ये जात प्रमाणपत्र २३,रहिवासी प्रमाणपत्र १२,उत्पन्न प्रमाणपत्र ५३,नॉन क्रिमीलेअर ३,वय-अधिवास-राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र २७ अशा प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याशिवाय आधार अद्ययावत सेवा ४०,आयुष्यमान कार्ड ९१,रोहयो अंतर्गत ३३ लाभ,एस.टी. महामंडळाच्या २८ सेवा,भूमी अभिलेख विभागाच्या २२ सेवा, तसेच पंचायत समितीच्या विविध योजनांअंतर्गत ५९ अर्ज स्वीकारण्यात आले.एकूण ९१८ नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला तर १६८ अर्ज पुढील कार्यवाहीसाठी स्वीकारण्यात आले. शिबिरात ७/१२ उताऱ्यांचे सार्वजनिक वाचन करण्यात आले तसेच विविध योजनांची माहिती देणारे पत्रके नागरिकांना वितरीत करण्यात आली.कृषी,भूमी अभिलेख व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांचे प्रत्यक्ष ऐकून त्यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे व तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या हस्ते झाले.यावेळी कळंब पंचायत समिती सभापती राजश्री वरपे,नायब तहसीलदार गोकुळ भराडिया तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. येरमाळा मंडळातील सरपंच व उपसरपंच,नवनिर्वाचित पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनीही उपस्थिती दर्शविली. या शिबिरासाठी खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलासदादा पाटील,आमदार राणा जगजितसिंह पाटील,माजी आमदार वसंत काळे यांना निमंत्रण देण्यात आले होते; मात्र अपरिहार्य कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत. शिबिरात नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचे निराकरण करण्यावर विशेष भर देण्यात आला. महसूल मंडळ मस्सा (खं.) अंतर्गत बळीराजा पाणंद रस्त्यांच्या कामांची माहिती संकलित करून संबंधित विभागांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरामुळे अनेक नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लागल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
More Stories
कळंब येथे मोफत एच.पी.व्ही.लसीकरणास प्रारंभ
जागतिक महिला दिनानिमित्त कळंबमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन;सहभागासाठी प्रवेश विनामूल्य
१६ वर्षांच्या संघर्षाला न्याय : लखन गायकवाड कळंब नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष;आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास