धाराशिव – उद्योजकतेला चालना देण्यासाठी व नवउद्योजकांना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने १८ मार्च २०२६ रोजी धाराशिव येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १०.३० वाजता एम.आय.डी.सी. कॅम्पस येथील ऑडिटोरियम हॉल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथे हा मेळावा होणार आहे. हा मेळावा कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग (महाराष्ट्र शासन),दे आसरा फाऊंडेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या उद्योजक मेळाव्यात व्यवसाय वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन, नवीन कल्पना (Ideas) मांडण्याची संधी,गुंतवणूकदारांशी संपर्क तसेच व्यवसायासाठी भांडवल उभारणीसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यावेळी ग्रामीण उद्योजकतेसाठी वित्तीय सहाय्य विषयातील तज्ञ पल्लवी पाटील (रुरल एंटरप्राइजेस फायनान्स सपोर्ट कन्सल्टंट) उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.तसेच उद्योजकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत व्यवसाय विकासासाठी आवश्यक दिशा दिली जाणार आहे. याशिवाय धाराशिव येथील सुप्रसिद्ध उद्योजक आणि शेती व मध उत्पादन क्षेत्रातील तज्ञ तेजस लिमकर यांच्यासोबत संवाद साधण्याची विशेष संधीही सहभागी उद्योजकांना उपलब्ध होणार आहे.तसेच शासनाच्या विविध विभागांकडून उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी या मेळाव्यात सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी ०२४७२-२९९४३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलिसनामा
खेळाडूंना दिलासा! ५ टक्के आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली सुरू; घरबसल्या डिजिटल प्रमाणपत्र मिळणार
इंधन पुरवठा समस्येसाठी तालुका निहाय अधिकारी नियुक्त