March 13, 2026

धाराशिवमध्ये बालविवाहमुक्त अभियानाला गती;चाइल्ड हेल्पलाईन १०९८ तर्फे जनजागृती उपक्रम

  • धाराशिव – बाल विवाह मुक्त अभियानाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यात जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून चाइल्ड हेल्पलाइन कक्ष अंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन १०९८ तर्फे धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
    जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए. बी. कोवे तसेच चाइल्ड हेल्पलाईन १०९८ चे प्रकल्प समन्वयक व्ही. पी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम पार पडले.
    या अभियानांतर्गत धाराशिव येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था अध्यापक विद्यालय, माविम अंतर्गत आयोजित कार्यशाळा, रविकिरण स्कूल धाराशिव, रामतीर्थ तांडा (तुळजापूर) येथे एन.एस.एस. कॅम्प, तसेच जि.प. प्रा. शा. तावरजखेडा, जि.प. प्रा. शा. खामसवाडी, जि.प. प्रा. शा. चिवरी, एस.एस.पी. महिला नेतृत्व विकास कार्यक्रम संवाद कार्यशाळा आणि जि.प. प्रा. शा. जागजी येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
    या कार्यक्रमांमध्ये बालहक्क, बाल संरक्षण तसेच मुलांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच बेटी बचाव – बेटी पढाव, बालविवाह प्रतिबंध आणि बालकांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहितीही उपस्थितांना देण्यात आली. बालविवाहाचे दुष्परिणाम आणि त्याविरोधात समाजाने जागरूक राहण्याची गरज यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
    यावेळी चाइल्ड हेल्पलाईन कक्षाच्या समुपदेशक वंदना कांबळे,सुपरवायझर अमर भोसले,पल्लवी पाटील तसेच केस वर्कर अभयसिंह काळे यांनी १०९८ चाइल्ड हेल्पलाईन या सेवेसंबंधी माहिती देत अडचणीत असलेल्या बालकांना मदतीसाठी या हेल्पलाईनचा वापर करण्याचे आवाहन केले.
    या जनजागृती कार्यक्रमाला संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बालविवाहमुक्त समाज घडविण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
error: Content is protected !!