धाराशिव – कळंब शहरातील मुस्लिम बांधवांना ईदच्या दिवशी नमाज अदा करण्यासाठी ईदगाह मैदानासाठी निश्चित करण्यात आलेली जागा तात्काळ उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कळंब शहरातील सर्व्हे क्रमांक ७ मधील जागा ईदगाह मैदानासाठी देण्याबाबत दिनांक २२ जुलै २०२१ रोजी संजय मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगर परिषद सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ४९० नुसार मंजूर करण्यात आली होती.त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला आणि भूमी अभिलेख विभागाकडून सदर जागेची मोजणीही करण्यात आली.मात्र प्रशासक कालखंडात हा विषय प्रलंबित राहिला. नवीन नगरपरिषद सभागृह अस्तित्वात आल्यानंतर दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन रमजान महिन्यात सदर जागेची स्वच्छता करून मुस्लिम बांधवांना ईदच्या दिवशी नमाज पठणासाठी उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली होती.मात्र पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला आहे. यामुळे दि.९ मार्च रोजी जिल्हाधिकारी धाराशिव यांची भेट घेऊन नगर परिषद अधिनियम १९६५ च्या कलम ३०९ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारांचा वापर करून संबंधित जागा मुस्लिम समाजाला ईदसाठी उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी करण्यात आली. यावेळी गटनेते संजय मुंदडा, नगरसेवक मोहसीन मिर्झा, नगरसेवक सागर मुंडे,नगरसेवक जमील खुरेशी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
More Stories
पत्रकारांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषद धाराशिवचा पुढाकार
राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांसाठी मार्गदर्शक तत्वे; जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभारता येणार नाही
परंड्यात १३ मार्चला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा