येरमाळा (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा २ एप्रिल २०२६ पासून सुरू होत असून यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी प्रशासनाने व्यापक नियोजन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेच्या नियोजनासाठी दि.९ मार्च रोजी शहीद शंकर बारकूल सभागृह, येरमाळा येथे प्रशासकीय नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी यात्रेच्या काळात भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीस पोलीस उपविभागीय अधिकारी (कळंब),तहसीलदार हेमंत ढोकळे,सहाय्यक गटविकास अधिकारी मनीषा सुकाळे,वाहतूक पोलीस निरीक्षक निशिकांत शिंदे,येरमाळा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक टी.आर.भालेराव, तालुका आरोग्य अधिकारी जे. एम.सय्यद,वैद्यकीय अधिकारी डॉ.सदानंद बिराजदार, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जयंत लाडे,सहाय्यक अभियंता परमेश्वर कुटे,बांधकाम विभागाचे अभियंता ए.व्ही.काळे, एमआरजीएसचे अभियंता संजय विभुते,पशुधन विकास अधिकारी डॉ.जी.बी.पवार,डॉ.महेश मोरे,परिवहन विभागाचे स्थानक प्रमुख सुरज पायाळ,अभिजीत धाकतोडे,मंडळ अधिकारी एम. डी.नागटिळक,देवस्थान ट्रस्टी समाधान बेदरे,माजी पंचायत समिती सभापती विकास बारकूल,पंचायत समिती सदस्या वृषाली पाटील,प्रशासकीय सरपंच प्रिया बारकूल,उपसरपंच गणेश बारकूल आदी उपस्थित होते. यात्रेदरम्यान आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी मंदिर परिसरात एक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी १९ वैद्यकीय अधिकारी, १० प्रवेशक,२० आरोग्य सेवक, १० सेविका आणि १० परिचर अशी कर्मचारी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.आवश्यक असल्यास अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. पोलीस विभागाकडून यात्रेच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून उपविभागीय अधिकारी स्तरावरील अधिकारी,१५ सहाय्यक पोलीस निरीक्षक,५० उपनिरीक्षक,सुमारे ४०० पोलीस कर्मचारी तसेच ५०० महिला-पुरुष होमगार्ड यांची तैनाती करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याची माहिती सपोनी टी.आर.भालेराव यांनी दिली.तसेच अवैध दारू विक्री रोखण्यासाठी स्वतंत्र पथक तसेच कायदा-सुव्यवस्थेसाठी दरोडा पथकही मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महावितरण विभागाकडून यात्राकाळात २४ तास थ्री-फेज वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता जयंत लाडे व सहाय्यक अभियंता परमेश्वर कुटे यांनी सांगितले. यासाठी कळंब व येडशी येथे आपत्कालीन वीजपुरवठा व्यवस्था तयार ठेवण्यात येणार असून गावातील डीपी व्यवस्थापनही करण्यात येणार आहे. परिवहन विभागाकडून यात्रेसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू असून धाराशिव विभागातून सुमारे २०० तर लातूर-बीड विभागातून सुमारे १५० बसांची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आल्याची माहिती कळंब आगार प्रमुखांनी दिली. यावेळी ग्रामस्थांनी यात्राकाळात उद्भवणाऱ्या काही समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले.त्यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून यात्रा सुरळीत व सुरक्षित पार पाडण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करून लाखो भाविकांच्या सोयी-सुविधांची काटेकोर व्यवस्था करण्याचा निर्धार व्यक्त केला.
More Stories
येरमाळ्यात येडेश्वरी चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवासाठी ६ मार्चला नियोजन बैठक
एनएमएमएस परीक्षेत ज्ञानोद्योग विद्यालयाची उज्ज्वल कामगिरी; १६ गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सत्कार
ज्ञानोद्योग विद्यालयात ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात साजरा!