धाराशिव (जिमाका) – परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की,अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स,वाहन नोंदणी,ई-चलन आदी सेवांशी संबंधित बनावट वेबसाइट्स,फसवे मोबाईल अॅप्स (APK) तसेच मोबाइल SMS/WhatsApp द्वारे पाठविण्यात येणाऱ्या खोट्या लिंकच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे.या प्रकारांमुळे वाहन चालक व मालकांची आर्थिक फसवणूक,वैयक्तिक माहितीची चोरी तसेच ओळख गैरवापराच्या घटना वाढत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व वाहन चालक/मालकांनी केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.अधिकृत संकेतस्थळे पुढीलप्रमाणे आहेत : १) वाहन नोंदणी सेवा (VAHAN) – https://vahan.parivahan.gov.in २) ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) – https://sarathi.parivahan.gov.in ३) परिवहन सेवा – https://www.parivahan.gov.in ४) ई-चलन पोर्टल – https://echallan.parivahan.gov.in वरील सर्व अधिकृत संकेतस्थळे “.gov.in” या डोमेनने समाप्त होतात. “.com”, “online”, “site”, “in” अशा डोमेनवरील कोणतीही संशयास्पद वेबसाइट नागरिकांनी उघडू नये,असे स्पष्ट करण्यात आले आहे. फसवणूक करणाऱ्यांकडून पाठविले जाणारे संदेश प्रामुख्याने खालीलप्रमाणे असतात : – आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड न भरल्यास कारवाई होईल, अशी धमकी देत अनधिकृत लिंक पाठविणे. – “DL (वाहन चालविण्याचा परवाना) सस्पेंड होणार आहे. त्वरित तपासणी करा.”अशा प्रकारचे संदेश पाठविणे. परिवहन विभाग किंवा RTO कार्यालयाकडून नागरिकांच्या मोबाईलवर कधीही WhatsApp किंवा इतर मोबाईल अॅपद्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही,याची विशेष नोंद घ्यावी,असेही विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच “RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan_Pay.apk” अशा अनधिकृत APK अॅप्स किंवा लिंक डाउनलोड करू नयेत.अशा अॅप्सच्या माध्यमातून OTP, बँकिंग माहिती तसेच मोबाईलमधील इतर संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास नागरिकांनी तात्काळ पुढील ठिकाणी तक्रार नोंदवावी : – नॅशनल सायबर क्राईम पोर्टल –https://www.cybercrime.gov.in – सायबर फसवणूक हेल्पलाइन – १९३० ही आहे.सर्व वाहन चालक,मालक तसेच नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहून योग्य ती दक्षता घ्यावी. अधिकृत माहितीसाठी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा वाहतूक विभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान