February 14, 2026

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लोककला महोत्सवाचा बोजवारा!

  • कळंब – शासनाच्या नावाखाली मोठ्या गाजावाजात जाहीर झालेला जिल्हास्तरीय लोककला महोत्सव प्रत्यक्षात मात्र मोजक्या कलाकारांपुरताच मर्यादित राहिल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात कळंब तालुक्यातील अवघ्या दोन कलाकारांनाच वारंवार संधी देण्यात आली,तर अनेक स्थानिक कलाकारांना पूर्णपणे डावलण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
    गुरुवारी सुरू झालेल्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत उपकेंद्र धाराशिव येथील विद्यार्थ्यांनाच सादरीकरणाची संधी देण्यात आल्याचे उपस्थितांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी कळंब तालुक्यातील एका कलाकाराला तब्बल तीन प्रकारांत व्यासपीठ देण्यात आले,तर दुसऱ्या कलाकाराला दोनदा संधी देण्यात आली.उर्वरित स्थानिक कलाकार मात्र प्रेक्षक म्हणूनच राहिल्याचे चित्र होते.
    शहरात किंवा तालुक्यात कोणतीही ठोस प्रसिद्धी न करता महोत्सव उरकण्यात आल्याने रसिकांनाही कार्यक्रमाची माहिती मिळाली नाही.ऐन परीक्षांच्या तोंडावर विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना पाचारण करून रिकाम्या खुर्च्या भरल्याचे दिसून आले.विद्यार्थ्यांना आनंद मिळाला असला,तरी खऱ्या रसिकांना व कलाकारांना संधी नाकारल्याने नाराजी वाढली आहे.
    लोककला जिवंत राहाव्यात आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. कलाकारांना मानधन दिले जाईल, असे सांगण्यात आले;मात्र प्रमाणपत्र नंतर दिले जाईल असे सांगण्यात आले. सन्मानचिन्हाबाबत कोणतेही नियोजन नसल्याची माहिती समोर आली आहे.अशा विस्कळीत कार्यक्रमांपेक्षा न घेतलेलेच बरे,अशी तीव्र प्रतिक्रिया कलाकारांनी व्यक्त केली.
    या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी व्हावी,अशी मागणी प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके,सामाजिक कार्यकर्ते बजरंग ताटे यांनी केली आहे.तसेच जेष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज आडसुळ यांनी प्रशासनाने किमान स्थानिक कलाकारांना विश्वासात घेऊन पारदर्शक पद्धतीने आयोजन करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.
    एकूणच,लोककलेच्या संवर्धनाच्या नावाखाली झालेल्या या महोत्सवाने प्रशासनाच्या नियोजनशून्य व अपारदर्शक कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.भविष्यात तरी स्थानिक कलाकारांना न्याय आणि सन्मान मिळेल का,हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
error: Content is protected !!