February 14, 2026

सुशील फुलारी उपशिक्षणाधिकारीपदी विराजमान

  • कळंब – कठोर परिश्रम,जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर पानगाव (जि.लातूर) येथील सुशील अरविंदराव फुलारी यांनी अखेर उपशिक्षणाधिकारी पदाला गवसणी घालत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण सेवा गट-ब (२०१७) विभागीय परीक्षेच्या शिफारस यादीत त्यांची निवड जाहीर झाली.२९ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या या यादीमुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    सुशील फुलारी हे सध्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब पंचायत समिती येथे शिक्षणविस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. २०१७ मध्ये झालेली ही परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेमुळे दीर्घकाळ प्रलंबित राहिली होती.मात्र, कोणत्याही अडथळ्यांना न जुमानता आणि संघर्षाची साथ न सोडता त्यांनी सातत्याने अभ्यास सुरू ठेवला.अखेर त्यांच्या मेहनतीला यश आले.
    यापूर्वी २००८ मध्येही त्यांनी या पदासाठी प्रयत्न करत मुलाखतीपर्यंत मजल मारली होती.त्या अपयशातून धडा घेत त्यांनी पुन्हा नव्या जोमाने तयारी सुरू ठेवली.त्यांच्या या प्रवासातून चिकाटी आणि आत्मविश्वासाचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे.
    आपल्या कार्यकाळात फुलारी यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. गुढीपाडवा प्रवेश वाढवा,मिशन शिष्यवृत्ती आणि परीक्षा एक,मार्गदर्शक अनेक यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले तसेच शाळांमधील प्रवेशसंख्या व निकालातही सकारात्मक बदल दिसून आला.त्यांच्या या कार्याची दखल राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनीही घेतली होती.
    त्यांच्या निवडीमुळे लातूर व धाराशिव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात समाधान व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.सहकारी अधिकारी, शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
error: Content is protected !!