धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत परळी वैजनाथ (जिल्हा बीड) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक ‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो, २०२६’ या प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याधरण कडवकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ.धनंजय महाजन तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. वैभव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोगो अनावरणानंतर संवाद साधताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की,पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे.परळी वैजनाथ येथे होणारे हे महाप्रदर्शन देशातील जातीवंत पशुधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना दुग्धव्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान एका छताखाली पाहण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालक, तरुण उद्योजक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट देऊन आपले ज्ञान व उत्पन्न वाढवावे. प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ.धनंजय महाजन यांनी सांगितले की,या महा एक्स्पोमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील जातीवंत गायी,म्हशी,शेळ्या-मेंढ्या तसेच विविध पक्षी प्रजातींचे दर्शन घडणार आहे. यासोबतच आधुनिक डेअरी फार्मिंग,चारा व्यवस्थापन,प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स,पशुधन आरोग्य,लसीकरण व वैज्ञानिक संगोपनावर तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. लोगो अनावरणानंतर संपूर्ण जिल्ह्यात या प्रदर्शनाची व्यापक प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येणार असून,सर्व पशुवैद्यकीय संस्था,पंचायत समित्या व सार्वजनिक ठिकाणी बॅनर-पोस्टर्सद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून घरपोच माहिती देण्याचेही नियोजन विभागाने केले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पशुपालक,शेतकरी व उद्योजकांनी ‘महा पशुधन एक्स्पो २०२६’ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक