February 10, 2026

अजित पिंगळे यांची शिवसेना धाराशिव–कळंब जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

  • कळंब–शिवसेना पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने अजित पिंगळे यांची धाराशिव–कळंब विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर झाली असून,पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
    अजित पिंगळे हे जिल्ह्यातील एक अभ्यासू,पक्षनिष्ठ आणि सातत्याने जनसंपर्क ठेवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली असून,त्या निवडणुकीत ९५ हजारांहून अधिक मते मिळवत त्यांनी मजबूत जनाधार सिद्ध केला. निवडणुकीतील निकाल काहीही असो,त्यांनी मतदारसंघातील जनतेशी असलेले नाते कायम ठेवत संघटनात्मक कामात खंड पडू दिला नाही.
    बाळासाहेब ठाकरे यांचे बाल सैनिक म्हणून त्यांची जिल्ह्यात विशेष ओळख आहे.शिवसेनेच्या विचारांशी असलेली त्यांची निष्ठा आणि कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळ्याचा थेट संपर्क ही त्यांच्या नेतृत्वाची मोठी ताकद मानली जाते.तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली कार्यकर्त्यांमध्ये विश्वास आणि प्रेरणा निर्माण करणारी ठरली आहे.
    विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी अधिक जोमाने मतदारसंघात सक्रिय भूमिका घेत विविध सामाजिक,संघटनात्मक आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने काम सुरू ठेवले.जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय मानले जातात.
    त्यांच्या नियुक्तीमुळे धाराशिव–कळंब परिसरात शिवसेना संघटनेला अधिक बळ मिळेल,कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल आणि पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचेल,असा विश्वास पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
error: Content is protected !!