September 12, 2026

संभाजी विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

  • वाशी- ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक वाय. बी.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव लिंगी येथील संभाजी विद्यालयात दि. ६ डिसेंबर २o२३ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे जेष्ठ शिक्षक सुनिल बावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
    युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पददलित समाजाचे सर्वश्रेष्ठ नेते होते.अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला व विद्याभ्यासात सतत रममाण होणारा विद्वान,अस्पृश्य समाजाचा स्वाभिमान जागृत करून डॉ.बाबासाहेबआंबेडकर अस्पृश्यांसाठी केलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना अन्यायाचा प्रतिकार करण्यास आणि न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्यास शिकविले.अस्पृश्य हेदेखील याच देशाचे नागरिक आहेत आणि या देशावर इतर कोणाहीइतकाच अस्पृश्यांचाही अधिकार आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
    ३ एप्रिल, १९२७ रोजी त्यांनी ‘बहिष्कृत भारत‘ हे पाक्षिक सुरू केले.अस्पृश्यबांधवांवर शतकानुशतके होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याबरोबरच तथाकथित सवर्ण गणल्या जाणाऱ्या हिंदूंकडून होत असलेल्या विपर्यस्त प्रचारास सडेतोड उत्तर देण्याचे कार्य या पाक्षिकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केले. १५ नोव्हेंबर, १९२९ पर्यंत हे पाक्षिक सुरू होते.
    अस्पृश्यतेतून निर्माण होणारे दुःख व वेदना डॉ.बाबासाहेबांनी प्रत्यक्ष अनुभवल्या होत्या. साहजिकच, अस्पृश्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांचे मन पेटून उठले. त्यातूनच त्यांनी अस्पृश्यांचे हक्क प्रस्थापित करण्याच्या कार्याला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी भारतातील दलित समाजाच्या उद्धारासाठी जे कार्य केले त्यास इतिहासात तोड नाही. आपल्या अस्पृश्य बांधवांना संघटित करून त्यांना अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यास व न्याय्य हक्कांसाठी झगडण्यास त्यांनी तयार केले. अशा प्रकारे त्यांनी दलितांमधील अस्मिता जागृत केली. त्याचबरोबर दलितांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहाशी जोडून आणि भारताची राज्यघटना तयार करून त्यांनी या देशाचीही फार मोठी सेवा केली.
    विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांच्या महान राष्ट्रसेवेप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रारंभाचा योग साधून १४ एप्रिल, १९९० रोजी त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न‘ हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्यामुळे या सन्मानाचीही सर्वोच्चता सिद्ध झाली आहे.सन १९५४ ते १९५५ च्या दरम्यान त्यांची प्रकृती खूप खालावली होती. मधुमेह, अंधुक दृष्टी आणि इतर आजारांनी त्यांना ग्रासले होते. ६ डिसेंबर १९५६ रोजी मध्यरात्री १२:१५ वाजता त्यांचे महापरिनिर्वाण झाले. यावेळी ते दिल्लीत होते. विशेष विमानाच्या सहाय्याने त्यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईला आणले. त्यांच्यावर बौद्ध धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
    या प्रसंगी प्रशालेचे मुख्याद्यापक सावंत वाय.बी. तसेच सर्व शिक्षक सुहास जगताप, संतोष ढोले, संतोष बोडके शिक्षकेत्तर पत्रकार शिवराम शिंदे,दतात्रय जेवे आदी उपस्थीत होते.
error: Content is protected !!