गोविंदपूर – कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या आवारात बालआनंद मेळाव्यानिमित्त भरविण्यात आलेल्या बाल आनंद बाजाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतातून आणलेला भाजीपाला तसेच विविध खाद्यपदार्थांचे सुमारे ७० स्टॉल या बाजारात उभारण्यात आले होते.या बाजारातून सुमारे ३० हजार रुपयांची उलाढाल झाली. या बाल आनंद बाजारात कांदे, बटाटे,हिरवी मिरची,कोथिंबीर, मटकी,गवती चहा,वांगी,पालक, मेथी,गवार यांसह फळे, भाजीपाला व खाद्यपदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते.तसेच पाणीपुरी,भेळ,वडापाव,शेंगाचे लाडू,अंडापाव,चिकन बिर्याणी, चिकन सिक्स्टी-फाईव्ह,भजे, पापड,कोबी मंचुरियन,समोसा, इडली, मठ्ठा, फ्रूट सॅलड, पोहे, उपीट, गुलाबजामुन आदी पदार्थांना खरेदीदारांनी मोठी पसंती दिली. गोविंदपूरचा आठवडी बाजार मंगळवारी भरत असल्याने त्याच औचित्याने शाळेत हा बाल आनंद बाजार आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान, व्यावहारिक अनुभव, संवाद कौशल्य तसेच प्रामाणिकपणे व्यवसाय कसा करावा याचे धडे मिळावेत, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच आशोक मस्के, उपसरपंच संतोष मंडे, विष्णू मुंडे, आण्णासाहेब मुंडे, ज्योतिराम कोकाटे, आतुल पाटील, अगंद माळी, आश्रुबा मुंडे, बिभीषण मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक हनमंलू कनकवाड यांच्यासह शिक्षक गोविंद गोरे, संजय भालेराव, वसंत इंगळे, गणपत तपिसे, तसेच शिक्षिका मंजुषा घोळवे, मनीषा कदम, अनिता आनेराव, वैशाली बांगर, पौर्णिमा मुधोळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या बाल आनंद बाजारासाठी गोविंदपूर गावातील पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड