कळंब – २०२५ च्या नगरपरिषद निवडणुकीत २२५४ मतांच्या प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या शिवसेनेच्या सौ.सुनंदा शिवाजी कापसे यांनी दि.१ जानेवारी २०२६ रोजी नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्विकारली.नगरपरिषद कार्यालयातील भव्य समारंभात पदग्रहण सोहळ्यापूर्वी हलगी-ताशांच्या गजरात नगराध्यक्षा कापसे व नवनिर्वाचित नगरसेवकांनी शहरातून रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नगर परिषद मीटिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, निवडणूक प्रमुख दत्तात्रेय देऊळकर,शिवसेना नेते अजित पिंगळे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी (आप्पा) कापसे,मुख्याधिकारी मंजुषा गुरमे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात निवडणूक व्यवस्थापक व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्षा सुनंदा कापसे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रमुख पाहुण्यांनी राज्य सरकारच्या सहकार्याने शंभर दिवसांचा विशेष विकास आराखडा राबविण्याचा विश्वास व्यक्त केला.मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी नगरपरिषद प्रशासनाकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन देत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील तीर्थकर यांनी केले.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन