डिकसळ – येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी (दि. २९) सकाळी १०.३० वाजता झालेल्या विशेष ग्रामसभेत लातूर–कल्याण जनकल्याण द्रुतगती महामार्गाच्या आराखड्यात बदल सुचविण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सरपंच सौ.पुष्पा नानासाहेब धाकतोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेस तब्बल १०५ ग्रामस्थ हजर होते.आवश्यक गणपूर्ती झाल्यानंतर सभेची कार्यवाही सुरू झाली. या प्रकल्पामुळे लातूर ते मुंबई हे अंतर अवघ्या ४ ते ५ तासांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने जाहीर केले असून, सध्याचा लातूर–अंबाजोगाई–केज–बीड–जामखेड–अहिल्यानगर–कल्याण मार्ग बदलून लातूर–कळंब–इटकूर–पारा–ईटखर्डा–जामखेड–आष्टी–अहिल्यानगर असा अधिक सरळ, व्यवहार्य आणि खर्चिकदृष्ट्या लाभदायक मार्ग निश्चित करण्यात यावा,अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली.या पर्यायी मार्गामुळे सुमारे ६० ते ७० किलोमीटर अंतर कमी होणार असून,वेळ आणि प्रकल्पखर्चात मोठी बचत होईल, असेही ग्रामस्थांनी नमूद केले. धाराशिव जिल्हा कृषीप्रधान असल्याने या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या कृषीमालाला मुंबई–ठाणे महानगर प्रदेशात मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.विस्तृत चर्चेनंतर इम्रान नजमोद्दिन मुल्ला यांनी मांडलेला ठराव मंजूर करण्यात आला व हरिचंद गुणवंत कुंभार यांनी त्यास अनुमोदन दिले. हा मंजूर ठराव पुढील कार्यवाहीसाठी कळंब तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार तापडिया यांच्याकडे सादर करण्यात आला.यावेळी नानासाहेब धाकतोडे यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड