लोहटा (पूर्व) –विश्वरत्न बोधीसत्व प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्माचे उपासकांनी काटेकोरपणे पालन करावे,असे प्रेरणादायी आवाहन कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) येथील तक्षशिला बौद्ध विहारात आयोजित अभिवादन सभेत करण्यात आले. दिनांक ६ डिसेंबर २०२५,शनिवार रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक त्रिशरण पंचशील,बुद्धपूजा,धम्मपालन गाथा व भीमस्मरण करण्यात आले. सभेला शेकडो बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार विभाग प्रमुख लक्ष्मण धावारे,एल.आय.सी.चे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक गौतम वाघमारे,प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अविनाश घोडके,दादा ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी लक्ष्मण धावारे म्हणाले की,मनुवादी वर्चस्ववादास तिलांजणी देवून विश्वरत्न बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विज्ञानावर व मानवी मूल्यावर आधारित असलेला तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धम्माची दिक्षा दिली.म्हणून बौद्ध उपासकांनी बौद्ध धम्माचे काटेकोरपणे पालन करावे.
तसेच अविनाश घोडके आपल्या प्रभावी मनोगतात म्हणाले की,हजारो वर्षे किड्या-मुंग्यागत जीवन जगणाऱ्या समाजाला मानाचा दर्जा देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्य झिजवले.भारतीय संविधानाद्वारे त्यांनी समानता, न्याय आणि बंधुतेचा अधिकार दिला.त्यांच्या मार्गावर चालणे हीच खरी कृतज्ञता आहे.
तर गौतम वाघमारे यांची प्रेरणादायी मांडणीत उपस्थितांना उद्देशून सांगितले की,प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेबांनी दुःख सहन करून समाजाला सुख दिले. त्यांनी घडवलेल्या आयुष्याचे आपण बेईमान होऊ नये.त्यांच्या कष्टांची जाणीव समाजाच्या मनामनात टिकली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तुषार शिंदे यांनी केले तर आभार भारतीय बौद्ध महासभा व तक्षशिला विहार अध्यक्ष रूपसेन ढगे यांनी मानले. कार्यक्रमास हनुमंत ढगे,संजय ढगे, आनंद ढगे,सारिका ढगे,सुप्रिया ढगे,शिलाबाई टोपे,निर्मला जिने यांच्यासह शेकडो बौद्ध अनुयायांची उपस्थिती होती.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर