गडचिरोली (जिमाका) – गडचिरोलीचा चेहरा झपाट्याने बदलत असून औद्योगिकतेसोबतच आता आरोग्य क्षेत्रातही क्रांती होत आहे. यामुळे जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा दक्षिण गडचिरोलीत उपलब्ध होतील,”असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहेरी येथे केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण आणि सिरोंचा येथे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा.लि.च्या ३५० खाटांच्या अत्याधुनिक हॉस्पिटल व कॉलेज प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमास सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल,आमदार धर्मरावबाबा आत्राम,आमदार डॉ. मिलिंद नरोटे,विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बीदरी,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले,अहेरीतील १०० खाटांचे रुग्णालय हे मातृत्व,बाल आरोग्य आणि कुपोषणग्रस्त बालकांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले केंद्र ठरेल.तसेच रुबी हॉस्पिटलमुळे गडचिरोली, तेलंगणा व छत्तीसगडातील रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार स्थानिक स्तरावरच मिळतील. या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत २४०० आजारांवर मोफत उपचार मिळतील.याशिवाय वैद्यकीय आणि नर्सिंग कॉलेज सुरू होणार असल्याने स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील,असेही त्यांनी सांगितले. औद्योगिक प्रगतीबरोबर ग्रीन हब निर्माण करण्यासाठी पाच कोटी झाडांची लागवड व ५०० कोटींचे रस्ते बांधकाम प्रकल्प सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल म्हणाले,गडचिरोलीच्या विकासासाठी उद्योग–आरोग्य–महिला सक्षमीकरण या त्रीसुत्रीवर आधारित आराखडा राबविला जात आहे.जिल्ह्यातील महिलांसाठी तीन कोटी रुपयांचा फिरता निधी मंजूर झाला असून, प्रत्येक बचत गटाला एक लाख रुपये देण्यात येणार आहेत. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री यांच्या हस्ते बिरसामुंडा महिला बचत गट आणि राजाराम गटाला निधी वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रास्ताविक केले.
More Stories
प्रजासत्ताक दिन : केवळ सोहळा नव्हे, तर जबाबदारीची आठवण
गुटखा विक्री केल्यास आता मोक्का लावणार – मुख्यमंत्री फडणवीस
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आ.कैलास पाटलांचा विधानभवनात प्रहार!