धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानांच्या वाटपाबाबत काही अडचणी आणि तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होत आहेत.या तक्रारी तत्काळ नोंदवून त्यांचे निवारण करण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासनाने एक विशेष टोल-फ्री क्रमांक १०७७ कार्यान्वित केला आहे. हा टोल-फ्री क्रमांक सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत कार्यरत राहणार आहे.शेतकरी या क्रमांकावर अनुदान वाटप,रक्कम न मिळणे,अर्जाची स्थिती,तसेच संबंधित शासकीय कार्यालयांकडून होणारा विलंब यासंबंधी आपली तक्रार नोंदवू शकतात. प्राप्त तक्रारींचे निवारण संबंधित विभागामार्फत तात्काळ करण्यात येईल,असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या सेवेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण वेगाने व सुलभपणे करता येईल,असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव (महसूल शाखा) यांच्यामार्फत देण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना थेट तक्रार नोंदविण्यासाठी सोयीस्कर व पारदर्शक माध्यम उपलब्ध करून देणे हा आहे. शेतकऱ्यांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी केले आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य