मुंबई – राज्यातील ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी हरित ऊर्जा,डिजिटलायझेशन आणि ग्राहक सशक्तीकरणावर भर दिला जात आहे.भविष्यात महाराष्ट्राला देशाची हरित ऊर्जा राजधानी बनवण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून,प्रत्येक घर,व्यवसाय आणि शेतकऱ्यापर्यंत हरित ऊर्जेचा लाभ पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मुंबई येथे झालेल्या डिस्ट्रीब्यूशन युटिलिटी मीट २०२५ या नवव्या वार्षिक विद्युत वितरण उपयुक्तता परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, तसेच इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम, एआयडीए, एमएसइडीसी आणि टाटा पॉवर या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री अतुल सावे म्हणाले,महाराष्ट्र राज्य स्वच्छ आणि हरित ऊर्जा क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत राज्यात २७,६७४ मेगावॅट हरित ऊर्जा निर्मिती झाली असून, महाराष्ट्र देशातील अग्रगण्य हरित ऊर्जानिर्मिती राज्य ठरले आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून राज्याने मोठी झेप घेतली असून सध्या एकूण ११,७०३ मेगावॅट वीज निर्मिती केली जात आहे. यात ग्रिड-कनेक्टेड सौर प्रकल्प, छतावरील सौर प्रणाली आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यांचा समावेश आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांना स्वस्त, स्वच्छ आणि टिकाऊ ऊर्जेचा लाभ मिळत आहे. राज्य शासनाने आठ ग्रीन हायड्रोजन उत्पादकांसोबत सामंजस्य करार केले असून, त्यातून १,०१० किलो टन प्रति वर्ष उत्पादनाची अपेक्षा आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे २,९१,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक, ५.६७ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जनात घट आणि सुमारे ६८,००० रोजगार संधी निर्माण होतील.
यासोबतच लघु जलविद्युत, कृषी व औद्योगिक कचरा तसेच नगरपालिका घनकचरा यापासून वीज निर्मिती केली जात असून, शेतापासून कारखान्यापर्यंत उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून ऊर्जेची गरज भागवली जात आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत पीएम सूर्यघर-मुक्त बिजली योजनेअंतर्गत राज्यातील ३३,५१५ शासकीय इमारतींवर सौर यंत्रणा बसविण्यात येणार आहेत. तसेच, पीएम-कुसुम बी योजना अंतर्गत देशभरातील ९,०३,४४४ सौर पंपांपैकी महाराष्ट्रात ५,१०,००० सौर पंप बसवले गेले आहेत,जो एक विक्रम असून राज्याच्या ऊर्जाक्षेत्रातील नेतृत्व अधोरेखित करतो असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले. राज्य सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा धोरण २०२० अंतर्गत १७,३६० मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून,त्या दिशेने महाराष्ट्र ठामपणे वाटचाल करत आहे.हरित ऊर्जेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि टिकाऊ ऊर्जा प्रणाली निर्माण करून महाराष्ट्र देशाची हरित ऊर्जा राजधानी बनवण्याच्या दिशेने पुढे सरकत आहे,असा विश्वास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.
More Stories
महाराष्ट्रात गेमिंग व क्रिएटर इकॉनॉमीला चालना;डिजिटल पायाभूत सुविधांवर भर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“स्थगिती नसताना शेतकऱ्यांचे पैसे का अडवले?” – २०२० च्या पीकविम्यावर आमदार कैलास पाटील विधानसभेत आक्रमक
१७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा;शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी – कृषी विभागाचे आवाहन