February 9, 2026

दिव्यांगांच्या विशेष शाळेतील मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

  • धाराशिव (जिमाका) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये शासकीय /अनुदानित/ विना अनुदानित व कायमस्वरुपी विना अनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळा/कर्मशाळामधील दिव्यांग मुला-मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांना खेळामध्ये संधी मिळावी. त्यांच्यातील सुप्त क्रीडाविषयक कौशल्यांना संधी मिळावी व त्यायोगे दिव्यांग व्यक्तींमधील न्युनगंड दूर होवून त्यांचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन विकसीत व्हावा. तसेच दिव्यांग व्यक्तीसुध्दा समाजाचा एक उपयुक्त घटक म्हणून पुढे यावा यासाठी दरवर्षी 3 डिसेंबर या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय दिव्यांग मुलामुलींच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन जि.प.च्या समाज कल्याण विभाग यांच्या विद्यमाने करण्यात येत आहे.
    जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना राज्यस्तरीय अपंग मुलामुलींच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन 20 व 21 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये श्री तुळजाभवानी स्टेडियम येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रवर्गनिहाय मुकबधीर 375, अस्थिव्यंग 250, मतिमंद 360 व अंध 25 असे एकूण 1010 स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धा 2 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रवर्गनिहाय व वयोगट निहाय मुला-मुलींसाठी स्वतंत्र क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
    या स्पर्धेमध्ये 25 मीटर भरभर चालणे, 50 मी धावणे, 100 मी धावणे, 200 मी धावणे, 400 मी धावणे, व्हील चेअर रेस, व्हील चेअरवर बसून सॉफ्टबॉल थ्रो, व्हील चेअरवर बसून गोळा फेक, लांब उडी, स्पॉट जंप, बादलीत बॉल टाकणे, बुध्दीबळ, गोळाफेक, चित्रकला, रांगोळी आदी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व क्रीडा स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पदक मिळविणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळेस गुणांकनानुसार सर्वसाधारण विजेतेपद देवून गौरविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.एम.गिरी यांनी केले आहे.
error: Content is protected !!