कळंब – स्थानिक कार्यकर्त्यांचा सन्मान न राखल्यास काँग्रेस पक्ष स्वबळावर रणशिंग फुंकणार! असा जाहीर इशारा देत कळंब शहर काँग्रेसने आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. नगराध्यक्षपदासह सर्व २० नगरसेवक पदांवर उमेदवार उतरवण्याचा ठाम निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. कळंब शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकीत पक्षाचे प्रभारी दादासाहेब मुंडे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पांडुरंग कुंभार, स्मिता शहापूरकर,प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार,वरिष्ठ नेते भागवत धस व ज्योती सपाटे यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यात आली. तालुका काँग्रेस अध्यक्ष आप्पासाहेब शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कळंब नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा असा एकमुखी संकल्प केला. बैठकीत संघटन बळकटीकरण, घराघरात संपर्क मोहीम राबविणे, नागरिकांपर्यंत काँग्रेसची विचारधारा पोहोचवणे आणि स्थानिक समस्यांवर ठोस पर्याय मांडणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.कार्यकर्त्यांनी एकजुटीने, जोमाने आणि आत्मविश्वासाने निवडणुकीत उतरायचा निर्धार केला. शहराध्यक्ष शशिकांत निरफळ, हरीभाऊ कुंभार,दिलीप देशमुख, शंकर करंजकर,रवी ओझा,विलास करंजकर,अंजली ढवळे,सचिन गायकवाड,भूषण देशमुख,रोहित कसबे,शीलानंद शिनगारे,ताहेर शेख,बबन हौसलमल,सिद्धू खैरमोडे यांच्यासह शहर व तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. याप्रसंगी दादासाहेब मुंडे म्हणाले — लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म प्रामाणिकपणे जपला.मात्र,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या आहेत. जर मित्रपक्षांनी योग्य प्रतिनिधित्व दिले नाही,तर काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्यास पूर्णतःतयार आहे.कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिल्यास काँग्रेस पक्ष नगराध्यक्षपदासह सर्व २० जागांवर उमेदवार उतरवून स्वबळावर झेंडा फडकवेल!असा स्थानिक काँग्रेसचा इशारा देण्यात आला.
## लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे,निष्ठेने आणि तळमळीने महाविकास आघाडीचा युती धर्म जपला. कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन आघाडीच्या उमेदवारांसाठी रात्रंदिवस परिश्रम घेतले.मात्र,आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांचा सन्मान,त्यांचे योगदान आणि त्यांच्या राजकीय हक्काचा न्याय देणाऱ्या निवडणुका आहेत. काँग्रेस पक्ष नेहमीच सामंजस्य, संवाद आणि आघाडीच्या धर्माचे पालन करणारा पक्ष आहे.त्यामुळे जर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी कळंब नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला सन्मानपूर्वक योग्य स्थान व प्रतिनिधित्व देऊन आघाडीत सामील करून घेतले,तर काँग्रेस पक्ष आघाडीबरोबर निवडणूक लढविण्यास तयार आहे.
— दादासाहेब मुंडे (काँग्रेस नेते,प्रभारी)
# स्थानिक स्तरावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सन्मान न राखता, त्यांना दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न झाला,तर काँग्रेस पक्ष स्वबळावर नगराध्यक्ष पदासह सर्व २० नगरसेवक पदांसाठी रणशिंग फुंकण्यास पूर्णपणे सज्ज आहे.
– पांडुरंग कुंभार सचिव – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा.नगराध्यक्ष नगर परिषद कळंब
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड