March 26, 2026

“आपत्तीच्या सावटातून साडेसांगवीत नवसंजीवनी — पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘आशेचा दिवा’ प्रज्वलित!”.

  • धाराशिव (जिमाका) –“आपत्तीने भूमी हादरली,पण माणसाचा आत्मविश्वास डगमगला नाही,” या शब्दांत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी साडेसांगवीकरांच्या जिद्दीला सलाम केला. पूरग्रस्त साडेसांगवी गावात दिवाळीचा उत्सव ग्रामस्थांसोबत साजरा करताना आशेचा दिवा प्रज्वलित झाला.
    गेल्या काही महिन्यांपासून पुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या या गावाने आज पुन्हा उभारी घेतली. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सरनाईक यांनी साडेसांगवीत भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील हनुमान मंदिरासमोर ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली.या प्रसंगी त्यांच्या पत्नी,मुलगा,सून व नातू यांच्यासह जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक रितू खोखर व सहायक जिल्हाधिकारी रैवैयाह डोंगरे उपस्थित होते.
    सरनाईक म्हणाले, “साडेसांगवी पुन्हा फुलवणं ही आमची जबाबदारी आहे. हे केवळ एक गाव नाही, तर श्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे.” त्यांनी सांगितलं की, पुराच्या पाण्याने या गावातील १७३ हेक्टरवरील पिकं वाहून गेली, तरी ग्रामस्थांनी आशा जिवंत ठेवली.
    ग्रामस्थांच्या गैरसोयीसाठी लवकरच गावाजवळील नदीवर दोन ठिकाणी पूल आणि अडीच किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात येईल. आज या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी सांगितले की, “या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.”
    कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिवाळी भेटवस्तू आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच फटाके वाटप करण्यात आले. प्रशासनाच्या माध्यमातून गावातील ४२ कुटुंबांना आर्थिक मदत, १६०० किलो चारा वाटप, तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना सहाय्य देण्यात आले आहे.
    या कार्यक्रमात विविध विभागांचे अधिकारी आणि साडेसांगवी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपत्तीच्या काळोखातून आशेचा दिवा पेटवणाऱ्या साडेसांगवीकरांच्या जिद्दीला या कार्यक्रमाने नवा उजेड दिला
error: Content is protected !!