February 9, 2026

“मदत करा – पूरग्रस्तांना वाचवा!” कळंबच्या ज्येष्ठ नागरिकांची हृदयस्पर्शी मदत रॅली

  • कळंब – सततच्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे शेती,जनावरे,घरे, शेतीसाहित्य यांचे प्रचंड नुकसान झाले असून आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदतीची नितांत गरज भासत आहे.या संकटग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी कळंब शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी दि. १० ऑक्टोबर रोजी “मदत करा – मदत करा पूरग्रस्तांना मदत करा!” अशा हाकांसह शहरातून मदत रॅली काढली.
    या फेरीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. ‘पूरग्रस्तांसाठी मदत’ असे लिहिलेले बॉक्स हातात घेऊन ज्येष्ठ नागरिकांनी मार्केट यार्ड, रंगीला चौक,अहिल्याबाई होळकर चौक,मेन रोड,सराफा लाईन,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राष्ट्रमाता जिजाऊ चौक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचून रॅलीचा समारोप केला.
    या मदत फेरीत ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ,ॲड.त्र्यंबकराव मनगिरे,ॲड.दिलीपसिंह देशमुख, अच्युतराव माने,राजाभाऊ आंधळे,विलास करंजकर,सुफी समशोद्दीन सय्यद,माधवसिंग राजपूत,कल्याण खापे,मधुकर शीलवंत,शिवाजी गडकर, गोकुळदास आडसुळ,बी.के. झाल्टे,उत्रेश्वर शिंगणापुरे,यशवंत हौसलमल,चंद्रकांत तांबारे,बशीर पठाण,गुलाब बागवान,पांडुरंग माळवदे,सरस्वती आडसुळ, साखरबाई काळे तसेच युवा कार्यकर्ते राहुल हौसलमल व बाळासाहेब कथले यांनी सहभाग घेतला.
    या रॅलीतून गोळा झालेली रु. २३,६०० इतकी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आली आहे.या उपक्रमातून कळंबच्या ज्येष्ठ नागरिकांनी समाजातील संवेदनशीलता आणि एकात्मतेचा सुंदर संदेश दिला आहे.

error: Content is protected !!