कळंब – धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतकरी, शेतमजूर तसेच बांधकाम मजूर यांना तातडीची मदत मिळावी,यासाठी धाराशिव जिल्हा बहुजन जनता पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन दिनांक ३० सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी संजय पाटील (कळंब) यांच्या मार्फत सादर करण्यात आले. निवेदनात करण्यात आलेल्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे – धाराशिव जिल्ह्यात ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा, शेतकऱ्यांना प्रति शेतकरी ५०,००० रुपयांचे अनुदान द्यावे,शेतमजुरांना गेल्या चार महिन्यांपासून रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतमजुरांना दिवाळीसाठी ५०,००० रुपये आर्थिक मदत द्यावी,बांधकाम मजुरांनाही अतिवृष्टीमुळे रोजगार गमवावा लागला आहे. त्यांनाही तातडीने मदत जाहीर करावी. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सततच्या पावसामुळे शेतमजुरांना कसल्याही प्रकारचे काम उपलब्ध नाही. शेतीपिकांवर अवलंबून असलेला मजूर वर्ग आज साध्या व्याजाने पैसे उचलून संसाराचा गाडा चालवत आहे. त्यामुळे शेतकरी आणि मजूर वर्ग या दोघांनाही तातडीने मदत मिळणे अत्यावश्यक आहे. यावेळी बहुजन जनता पक्षाने इशारा दिला की,जर शासनाने या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी उपविभागीय कार्यालय कळंब येथे तीव्र आंदोलन छेडले जाईल. या निवेदनावर नवनाथ भंडारे (जिल्हाध्यक्ष,बहुजन जनता पक्ष, धाराशिव),अश्रुबा शिंदे (तालुकाध्यक्ष),सुनील गायकवाड (जिल्हा उपाध्यक्ष),भारत कदम (तालुकाध्यक्ष),सुनील ताटे (भाजप कामगार मोर्चा मराठवाडा उपाध्यक्ष),रुपेश ओव्हाळ, प्रवीण जाधव, भारत कदम यांची स्वाक्षरी आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड