धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पिकांचे प्रचंड नुकसान, घरांची पडझड आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई या तिहेरी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या चिंतेला दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आदेशानुसार जिल्हा अग्रणी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकामार्फत सर्व बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, सद्यःस्थितीत शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी. तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरील होल्ड तातडीने हटवून शासनाकडून मिळणारे अनुदान व मदत रक्कम त्वरीत त्यांच्या खात्यात जमा करावी.
अलीकडे काही शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस प्राप्त झाल्या होत्या. याबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या नोटीस नव्या नसून लोकअदालत, पीककर्जाचे नूतनीकरण किंवा तडजोडीच्या संदर्भातील जुन्या नोटीस आहेत. तरीही मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत कोणत्याही नवीन नोटीस देऊ नयेत, अशा कडक सूचना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकाकडून सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही संभ्रम बाळगू नये, असा संदेश प्रशासनाने दिला आहे. या निर्णयामुळे अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, कर्जवसुलीची भीती दूर झाल्याने शेतकरी आता कुटुंब उभारणी व शेती पुनर्बांधणीसाठी निश्चिंतपणे काम करू शकतील, अशी भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य