महाराष्ट्र स्त्री-मुक्तीची राज्यस्तरीय परिषद डिसेंबरमध्ये मुंबईत
धाराशिव – राज्यातील बस स्थानकांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.अंधार्या जागा, सीसीटीव्ही कॅमेर्यांचा अभाव, सुरक्षा रक्षकांची अपुरी संख्या, तक्रार निवारण केंद्रांचा अभाव तसेच बस उशिरा मिळाल्याने महिलांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत असल्याचे शासन यंत्रणेतील घटक व विविध सामाजिक संस्थांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. जिल्ह्यातील सहा बस स्थानकांतील महिला सुरक्षाविषयक निष्काळजी पणाचा सर्वेक्षण अहवाल आणि विविध उपाययोजना परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे विभागीय नियंत्रकां मार्फत निवेदनाद्वारे सूचवल्या आहेत.या मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबई येथील आझाद मैदानात आठ हजार महिलांसह आंदोलन करण्याचा इशारा परिषदेच्या सदस्यांनी दिला आहे. तसेच महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेची राज्यस्तरीय परिषद डिसेंबर महिन्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या सुकाणू समितीच्या सदस्य डॉ.स्मिता शहापूरकर यांनी दिली. धाराशिव शहरातील संजीवन हॉस्पीटल येथे सोमवार,15 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुनिता बागल,सुरेखा जगदाळे,रंजिता पवार,वासंती मुळे,श्वेता पगारे,अॅड.अजय वाघाळे,गणेश वाघमारे,अब्दुल लतीफ,राजेंद्र धावारे,अब्दुल रौफ शेख उपस्थित होते.कांता शिंदे आणि वासंती मुळे यांनी सेफ्टी ऑडिटची माहिती दिली.रंजिता पवार यांनी परिषदेतर्फे होणाऱ्या युवा अभियानाची माहिती दिली.पुढील महिन्यात जिल्हा आणि विभाग स्तरावर परिषद घेण्यात येणार आहे. पुढे बोलताना डॉ.स्मिता शहापूरकर म्हणाल्या की,पुणे येथील स्वारगेट बस स्थानकाच्या आवारात 25 फेब्रुवारी रोजी एका तरुणीवर बलात्कार झाला होता. या घटनेनंतर राज्यातील सर्वच बस स्थानक आणि परिसराच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. बस स्थानकांमध्ये महिलांसाठी मिळणार्या विविध सोयी सुविधा आणि सुरक्षा याविषयी धाराशिव जिल्ह्यातील काही संस्थांनी बस स्थानकावर सकाळी आणि रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.या पाहणीमध्ये स्वयंसेवी संस्था आणि प्रतिनिधींना महिलांच्या सुरक्षेविषयी धक्कादायक चित्र दिसून आले.हा सर्व्हे 15 मे ते 30 जून या कालावधीत सकाळी व रात्री करण्यात आला. यावेळी सर्व्हेक्षण करणाऱ्या महीला कार्यकर्त्यांनी आपले अनुभव सांगितले. धाराशिव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील महिला सुरक्षाविषयक सुविधांचा स्त्री-मुक्ती संघटना,अणदूर येथील हॅलो मेडिकल फौंडेशन, नळदुर्ग व अणदूर येथे हॅलो मेडिकल फौंडेशन, सामर्थ्य कल्याणकारी संस्था,जिजाऊ ब्रिगेड,उमेद अभियान,सीआरपी,समता सैनिक दल,संत सेवालाल समृध्दी योजनेच्या प्रतिनिधींनी सर्वे केला आहे यातून त्यांना महिला सुरक्षाविषयक विविध समस्या आढळून आल्या.यात बसस्थानकात पूर्णवेळ महिला पोलीस नसणे,सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत,तक्रार निवारणाची व्यवस्था नाही,स्वच्छतागृह महिला -पुरूषांचे एकत्र आहे,स्वतंत्र सोय नाही,हिरकणी कक्ष बंद आहे,बस स्थानका बाहेर रिक्षाचालकांची बेशिस्त आणि महिलांना त्रासदायक वागणूक दिली जाते, लैंगिक छळ विरोधी माहितीपत्रके किंवा अनाउन्समेंट होत नाही, पोश अंतर्गत समिती अस्तित्वात नाही, कर्मचार्यांना महिला सुरक्षाविषयक उपाययोजनांची कसलीही माहिती नाही, बसस्थानकात रात्री अंधार असतो, अशा बाबी समोर आल्या आहेत. महिला प्रवाशांच्या या समस्या दूर करण्यासाठी सर्वेक्षण करणार्या संस्थांनी उपाययोजना सूचविल्या आहेत. यात स्वच्छतागृहात नियमित पाणी,स्वच्छता, व नि:शुल्क असावेत, स्थानकात भरपूर प्रकाश व्यवस्था असावी, हिरकणी कक्ष महिलांनी बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वच्छ व सुरक्षित असणे गरजेचे आहे, कक्षा वर तशी माहिती लिहिणे आवश्यक आहे,तत्काळ मदत, छेडछाड,लैगिक अत्याचार यासंबंधीच्या मदतीची हेल्प लाईनचा नंबर ठळक, मोठ्या अक्षरात आणि सहज दिसेल, असा लिहायला हवा. तो वाचता येईल अशा मराठी, कानडी आणि इंग्लिश अशा तीन भाषांमधून असायला हवा. तशी उद्घोषणाही वारंवार व्हायला हवी, तक्रार पेटी व मदत कक्ष स्वतंत्रपणे उपलब्ध असायला हवा, महिलांना, मुलींना रात्रीच्यावेळी व दिवसा थांबण्यासाठी सुरक्षित जागेची व्यवस्था हवी,अंतर्गत तक्रार समिती नसल्यास गठीत करून त्याचा बोर्ड दर्शनी भागात सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावा, अशा उपाययोजना राबविण्याची मागणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
राज्यस्तरीय स्त्री मुक्ती परिषद डिसेंबरमध्ये मागील 50 वर्षांत महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि संघटना, व्यक्ती एकत्रित येवून स्त्री मुक्ती परिषद हे स्त्रीवादी मंच निर्माण केला आहे. मंचाच्या वतीने वर्षभर जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर विविध उपक्रम करावयाचे योजिले आहे. या कार्यक्रमाची सांगता, 20, 21 व 22 डिसेंबर 2025 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार आहे. या परिषदेमध्ये मागील 50 वर्षांत झालेले काम आणि पुढील 50 वर्षांत करावयाचे काम यावर विचार विनिमय होणार आहे. समाजातील सर्वच घटकातील स्त्रिया, तृतीयपंथी, एलजीबीटी समूह, घर कामगार, ऊसतोड कामगार, कंत्राटी कामगार यांच्या प्रश्नांवर परिषद अधिक काम करणार आहे. समाजामध्ये समानता, विविधता आणि एकजुटीची चळवळ निर्माण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सुनिता बागल यांनी सांगितले.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान