आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण अनेक गोष्टींना प्राधान्य देतो.नोकरी, व्यवसाय, पैसा, समाजातलं स्थान, मित्रमंडळींचा सहवास. मात्र या सगळ्यांच्या मागे धावताना आपल्या आयुष्याचा मूळ आधार असणाऱ्या आई-वडिलांकडे आपण किती वेळ देतो, हे पाहणं गरजेचं आहे. या काळात आपण घरं मोठी बांधली, गाड्या विकत घेतल्या, परदेशात पोहोचलो; पण आई-वडिलांसाठी वेळ देणं मात्र दुर्मिळ झालं आहे. हेच आपल्या संस्कृतीचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. बालपणी आपल्या छोट्याशा हसण्यासाठी, एका खेळण्याच्या हट्टासाठी आई-वडिलांनी दिवस-रात्र घालवले. स्वतःच्या स्वप्नांना विराम देऊन त्यांनी आपली स्वप्नं पूर्ण केली. थकलेले असतानाही आईनं आपल्या पोटाला चिमटा काढत आपल्याला पोटभर खाऊ घातलं, वडिलांनी घामाने न्हाऊनसाखून आपल्यासाठी पै-पै जमवली. आपल्या प्रत्येक गरजेवर स्वतःच्या सुखाचा त्याग केला. शिक्षण, संस्कार, स्वप्नं. हे सर्व काही आपल्या मुलांना मिळावं म्हणून त्यांनी आपलं तारुण्य खर्च केलं. पण आज त्यांचं वय वाढलं, पाय कमजोर झाले, डोळ्यांची दृष्टी मंदावली, तरीही त्यांची अपेक्षा मोठी नसते. त्यांना फक्त आपल्या मुलांचं दोन प्रेमळ शब्द, थोडा वेळ, आणि साधं पण आपुलकीनं वाढलेलं अन्न हवं असतं. आज तेच आई-वडील वृद्ध झालेत. चालणं मंदावलं, डोळ्यांची दृष्टी कमी झाली, पण अपेक्षा वाढल्या नाहीत. त्यांना फक्त मुलांनी वेळ काढून बोलावं, सोबत जेवावं, एक प्रेमळ शब्द बोलावा, एवढंच पुरेसं असतं. मात्र वास्तव भीषण आहे. आपण अनेकदा पाहतो की आई-वडील वृद्धाश्रमात राहायला भाग पाडले जातात. बऱ्याच ठिकाणी आई-वडील दुर्लक्षित आहेत, काहींना वृद्धाश्रमात पाठवून दिलं जातं. पैशापाठी धावणाऱ्या पिढीला हे समजत नाही की, आई-वडिलांचा आशिर्वादच आपल्या आयुष्याचं खरं धन आहे. काही मुलं वारंवार “वेळ नाही”, “कामं खूप आहेत” असं म्हणून त्यांना दूर ठेवतात. पण खरी गोष्ट अशी आहे की वेळ आपल्याकडे आहे, फक्त प्राधान्य बदललेलं आहे. आजची पिढी तंत्रज्ञानात, करिअरमध्ये, पैशाच्या मागे इतकी धावते आहे की ‘आशीर्वाद’ या अमूल्य संपत्तीचं महत्व विसरली आहे. आई-वडिलांचा हात डोक्यावर असेपर्यंत आपण सुरक्षित आहोत. तो हात निघून गेला की, कोणतेही श्राद्ध आपल्याला ती उब परत देऊ शकत नाही. आपल्या समाजात एक विचित्र विडंबन पाहायला मिळते. आई-वडील जिवंत असताना त्यांना चार गोड बोल बोलायला, त्यांच्या सोबत बसून दोन घास जेवायला, त्यांच्या औषधोपचारांसाठी पैसा खर्च करायला अनेकदा हात आखडता घेतो. पण ते या जगातून गेल्यावर मात्र मोठ्या थाटामाटात दहावे, तेरावे, श्राद्ध, पिंडदान यांसारखे विधी करतो. समाजाला दाखवण्यासाठी केलेले हे आडंबर खऱ्या अर्थाने ‘प्रेमाचा देखावा’ ठरतो. ज्या आईनं उपाशीपोटी राहून मुलांना खाऊ घातलं, ज्या वडिलांनी अंगावरच्या घामाच्या धारा गाळून मुलांचं भविष्य घडवलं, त्यांच्यासाठी एक ग्लास पाणी जिवंत असताना वेळेवर द्यायला जमलं नाही, तर मृत्यूनंतर पिंडदान करून त्याचा काय उपयोग? खरी सेवा ही जिवंतपणी केली जाते, मृत्यूनंतर केलेली सेवा केवळ औपचारिकता उरते. आज समाजात हे प्रमाण वाढत चाललं आहे. वृद्ध आई-वडिलांना ‘ओझं’ समजून त्यांना दुर्लक्षित केलं जातं. काहींना तर वृद्धाश्रमात ढकलून दिलं जातं. आणि नंतर त्यांच्या मृत्यूनंतर समाजात प्रतिष्ठा टिकवण्यासाठी धूमधडाक्यात श्राद्ध केले जातात. हा दांभिकपणा लपवून ठेवता येत नाही. श्राद्ध, तर्पण, दहावे-तेरावे या परंपरांचा हेतू वेगळा होता. मृत व्यक्तीच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहणं, कृतज्ञता व्यक्त करणं. पण आज ते स्पर्धा, प्रतिष्ठा आणि दिखाव्याचं साधन बनलं आहे. लोकांना समाजात आपलं ‘नाव’ हवं असतं, पण आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं महत्व समजत नाही. आई-वडिलांच्या आठवणी, त्यांच्या आशीर्वादांची किंमत आपल्याला ते या जगातून गेल्यावरच प्रकर्षानं जाणवते. समाजाला यावेळी एक मोठा प्रश्न विचारावा लागतो, “जिवंत असताना थोडं प्रेम, थोडा वेळ, थोडं सांत्वन दिलं असतं, तर श्राद्धासाठी हजारो रुपयांचा खर्च करण्याची गरज पडली असती का?” म्हणूनच आजच्या समाजाला हे आवर्जून सांगावंसं वाटतं, “आई-वडील जीवंत असताना त्यांना चांगलं खाऊ घाला, वेळ द्या, प्रेम द्या, जपा, सेवा करा. मृत्यूनंतरच्या विधींना अर्थ नाही, खरी पूजा ही त्यांना हसतमुख ठेवण्यात आहे. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधानाचं हास्यच तुमच्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं यश आहे.” त्यांच्या डोळ्यातील आनंदच तुमच्या आयुष्याचं खरं धन आहे. समाजाला यावेळी एक मोठा प्रश्न विचारावा लागतो, “जिवंत असताना थोडं प्रेम, थोडा वेळ, थोडं सांत्वन दिलं असतं, तर श्राद्धासाठी हजारो रुपयांचा खर्च करण्याची गरज पडली असती का?”
श्राद्ध नव्हे, जिवंतपणीचं प्रेम हेच खऱ्या अर्थानं आई-वडिलांना अर्पण केलेलं तर्पण आहे.
More Stories
प्रजासत्ताक दिन : केवळ सोहळा नव्हे, तर जबाबदारीची आठवण
गुटखा विक्री केल्यास आता मोक्का लावणार – मुख्यमंत्री फडणवीस
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आ.कैलास पाटलांचा विधानभवनात प्रहार!