February 9, 2026

शहरात ढोल-ताशांच्या गजरात गणेश विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न

  • कळंब – शहरात दि.६ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश विसर्जनाचा भव्य सोहळा भक्तिमय वातावरणात आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात उत्साहात संपन्न झाला.गेल्या दहा दिवसांपासून शहरात विविध गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांमध्ये दिवसरात्र पूजाअर्चा,भजन,कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.विसर्जन मिरवणुकीने या सोहळ्याला परिपूर्णता लाभली.
    शहरातील सहयोग गणेश मंडळ,श्री.शिवशंकर गणेश मंडळ, शिव सेवा गणेश मंडळ आदींसह अनेक गणेश मंडळांच्या प्रतिमा पारंपरिक व आधुनिक सजावटीत सजवून मिरवणुकीसाठी आणल्या गेल्या. युवकांनी एकसारख्या गणवेशात शिस्तबद्ध मिरवणूक काढली.
    ढोल-ताशांच्या गजरात,लेझीमच्या तालावर आणि आकर्षक नृत्याच्या सादरीकरणामुळे वातावरण उत्साही झाले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले.
    मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी शहरातील व्यापारी,नागरिक, महिला मंडळे यांनी फुलांच्या उधळणीने,थंड पाण्याचे स्टॉल, शरबत व प्रसादाचे वाटप करून मिरवणुकीत सहभागी भाविकांचे स्वागत केले.यामुळे भाविकांना मोठा आनंद झाला.
    गणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला होता.ठिकठिकाणी पोलीस अधिकारी,कर्मचारी व स्वयंसेवक तैनात होते.नगर परिषदेकडून स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.यामुळे मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुशासनभंग न होता विसर्जन सोहळा शांततेत संपन्न झाला.गणपती बाप्पांच्या मिरवणुकीत लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरासह आधुनिक डीजेच्या तालावर तरुणाईने नृत्य करून गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
    विसर्जन मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत शेवटी मांजरा नदीच्या विसर्जन घाटावर पोहोचली. तिथे धार्मिक विधी व मंत्रोच्चारांच्या गजरात गणरायांना निरोप देण्यात आला. वातावरणात भक्तीभाव,आनंद आणि भावनिक ओलावा पाहायला मिळाला.

error: Content is protected !!