धाराशिव (जिमाका) – आगामी काळात जिल्ह्यात विविध धार्मिक उत्सव,यात्रा-जत्रा तसेच आंदोलनात्मक कार्यक्रम पार पडणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) अन्वये २७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १ वाजतापासून ते ९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान श्री.गणेश उत्सव साजरा होत आहे.त्यामध्ये श्री.गणेश आगमन, मिरवणूक,गौरी आगमन,दिड दिवसांचे व त्यापुढील दिवसाचे गणेश विसर्जन व मिरवणूक यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे.५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद उत्सव जिल्ह्यात साजरा होणार असून यासाठी मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघून मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी तसेच वक्फ कायदा विरोधात विविध पक्ष/ संघटना यांचेकडून आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पीकविमा व नुकसान भरपाईची देय रक्कम मिळावी तसेच इतर मागण्याच्या अनुषंगाने शेतकरी तसेच विविध पक्ष/संघटना यांचेकडून धरणे, मोर्चे,उपोषण,आत्मदहन,बंद,निदर्शने, तालाठोको व रास्ता रोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मनाई आदेश काढण्यात आले आहे. हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी जारी केला आहे.या आदेशान्वये शस्त्रे,लाठ्या,दगड,स्फोटके, ज्वलनशील पदार्थ जवळ बाळगणे बंदी आहे.आक्षेपार्ह भाषणे,घोषणाबाजी, प्रक्षोभक वर्तन,चित्रफलक किंवा असभ्य वर्तनास मनाई आहे.पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी परवानगीशिवाय एकत्र येणे,मोर्चा किंवा मिरवणूक काढणे प्रतिबंधित आहे. तथापि,हा आदेश अंत्ययात्रा,धार्मिक विधी,लग्न सोहळे,सामाजिक -सांस्कृतिक सण,शासकीय कार्यक्रम तसेच शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी यांना लागू राहणार नाही.सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमांसाठीही हा आदेश अपवादात्मक आहे. जर कोणाला या काळात सभा,मोर्चा किंवा मिरवणूक काढायची असेल,तर त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे अनिवार्य आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान